लग्नानंतर केली स्पर्धा परीक्षेची तयारी अन् विद्या पाटील बनल्या क्लास वन अधिकारी !
Success Story : खरंतर लग्नानंतर अभ्यास करायला जमेल की नाही? असा सर्वांपुढे प्रश्न असतो. पण विद्या पाटील यांनी विवाहानंतर यशस्वी वाटचाल केली. यासाठी विद्या पाटील यांना त्यांच्या कुटुंबातून पाठिंबा मिळाला. जळगाव जिह्यातील अंतुर्ली बुद्रूक या गावातील रहिवासी….त्यांचे वडील शेतकरी तर आई गृहिणी. त्यांचे याच भागातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.
माध्यमिक शिक्षण हे पी.के.शिंदे हायस्कूलमध्ये झाले असून पाचोऱ्यात महाविद्यालयीन शिक्षण झाले. विद्या पाटील यांनी बारावीनंतर अध्यापिका विद्यालय जळगाव येथे डी.एडचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि इतिहासात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षण होताच त्यांचा विवाह झाला.
विवाह झाल्यानंतर त्यांनी स्वप्नांच्या पुर्ततेसाठी मेहनत घेतली. त्याच वर्षी पी.एस.आय पदासाठीची पूर्व परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली. शारीरिक अडचणींमुळे पुढचा टप्पा पूर्ण करता आला नाही. निराश न होता त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. २०२१ या वर्षी त्यांनी खऱ्या अर्थाने तयारीला सुरुवात केली. सर्व परिस्थितीवर मात करत कुटुंबीयांच्या पाठिंब्यावर अभ्यास सुरू ठेवला आणि मागील दोन वर्षात त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल चार सरकारी नोकऱ्यांना गवसणी घातली. सध्या त्यांची मुख्याधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील प्रत्येकाला प्रेरणादायी ठरावा, असा आहे.