MPSC Success Story : ग्रामीण भागात मुलांमध्ये खूप गुणवत्ता भरलेली असते. त्यास योग्य वाट दिली की यशाचा मार्ग काढतातच. यात ध्येय महत्त्वाचे असते. ध्येयाचा ध्यास केला की यश हमखास मिळतेच. असाच परभणीतील विकास कोंडीबा कुकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात उत्तीर्ण झाला आहे.
विकासचे वडील कोंडीबा कुकडे हे इलेक्ट्रिशियन असून शहरासह ग्रामीण भागातील विद्युत दुरुस्ती, लाईट फिटींगची कामे करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी मुले-मुलींना शिक्षणात काहीच कमी पडू दिले नाही. एक मुलगी इंजिनिअर तर दुसरी मुलगी शिक्षिका बनली आहे. तर विकास यांस जिद्दीच्या जोरावर यापूर्वी देखील एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवत कर सहाय्यक पदाची नोकरी मिळाली होती. मोठा अधिकारी होण्याची जिज्ञासा बाळगून त्यांनी नोकरी करत पुन्हा अभ्यासात स्वतःला झोकून दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा २०२२ या परीक्षेत सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात ८४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच एन.टी.सी. प्रवर्गातून राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
विकास कुकडे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गांधी विद्यालय शाखा कृषी सारथी कॉलनी परभणी या शाळेतून झाले आहे. अकरावी आणि बारावीचे शिक्षण संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय परभणी येथून घेतले. ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथून कला शाखेची पदवी संपादन केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांनी पुणे या ठिकाणी जाऊन पुढील शिक्षण घेतले.पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सप्टेंबर २०१९ पासून महाराष्ट्र शासनाच्या वस्तू आणि सेवा कर विभागात कर सहाय्यक या पदावर रुजू आहेत.
पण आता नुकत्याच लागलेल्या निकालात त्याची ८४व्या क्रमांकाने निवड झाली आहे.तसेच राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.एम.पी.एस.सी.च्या जाहिरातीतील पदांचा विचार करता त्यांची तहसीलदार, मुख्याधिकारी (नगर परिषद), शिक्षणाधिकारी तसेच सहायक राज्यकर आयुक्त यापैकी कुठल्याही पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे.