झपाटून अभ्यास केला आणि विलास झाले उपजिल्हाधिकारी!
MPSC Success Story : आपण जर दिवसरात्र अभ्यास केला तर एक ना एक दिवस या कष्टाचे फळ मिळते.याचे उदाहरण म्हणजे विलास नरवटे. विलास हे शेतकरी कुटूंबात वाढलेले….त्यांचे वडील बळीराम नरवटे व आई कलावतीबाई नरवटे हे दोघेही शेतीकाम करतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून होते. पण मुलांना उच्चशिक्षित केले तर ते एक ना एक दिवस नाव कमावतील हीच इच्छा मनाशी पक्की करून त्यांना मुलांना घडवले. त्यामुळे त्यांचे मोठे भाऊ जिजाराम हे पोलीस दलात नोकरीस लागल्यावर विलास यांना आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मदत करायचे. याच कष्टाची जाणीव विलास यांनी देखील ठेवली. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
विलास नरवटे यांनी अहमदपूर तालुक्यातील नरवाटवाडी या लहानशा गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण करून वसमत येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुणे येथे बी.ई मेकॅनिकल डिग्री पूर्ण केली व लॉ एलएलबी शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर विलास यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.२०२० मध्ये विलास यांना सहकार विभागात सहायक निबंधक म्हणून नोकरी मिळाली होती तरी सुद्धा विलासने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणे सुरूच ठेवले.
विलास बळीराम नरवटे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मेरिट लिस्ट मध्ये महाराष्ट्रात 33 तर एनटीसी प्रवर्गातुन महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आल्याने त्यांची उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली.स्वतःच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास ठेवून झपाटून अभ्यास करणे हाच यशाचा मार्ग आहे.