⁠  ⁠

४ वर्षाचा असताना आई वारली, वडील तुरुंगात गेले, मात्र पोराने एमपीएससी परीक्षेत मारली बाजी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

आपले कोणतेही यश बघायला आई – वडील हवेत. हेच प्रत्येकाला वाटत असते. पण विष्णूची गोष्ट निराळी आहे. विष्णू अवघा ४ वर्षाचा असताना हिंसाचारामुळे त्यांच्या आईचे निधन झाले होते, तर खुनाच्या आरोपाखाली वडील कारागृहात शिक्षा भोगत होते. मात्र, असं असताना देखील विष्णू कांबळे आजोळी राहून त्याने शिक्षण पूर्ण केले आणि सरकारी नोकरी पण मिळवली.

विष्णूची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंतापदी निवड झाली आहे. एमपीएससी मार्फत झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० मध्ये विष्णू कांबळे यांनी खुल्या प्रवर्गातून ४१ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तर अनुसूचित जाती प्रवर्गातून तो प्रथम आला.

विष्णूचे मूळ गाव मदनसुरी ता. निलंगा आहे. आईचे निधन आणि वडील तुरुंगात असल्याने तेव्हापासून त्यांचा सांभाळ मामा आणि आजी यांनी आजोळी केला.घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे समाज कल्याण वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण केले.

दरम्यान, विष्णू कांबळे यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या आजोळी जि. प. प्राथमिक शाळा चिंचोली भुयार ता उमरगा येथे झाले. पुढील शिक्षणाची आजोळी सोय नसल्यामुळे लातूर येथील मावशीकडे राहून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्याने गुरू गोविंद सिंह अभियांत्रिकी विद्यालय नांदेड येथे बी.टेकचे शिक्षण घेतले. सन २०१६ साली पॉलिटेक्निक परीक्षा शेवटच्या सत्रात ८९ टक्के घेऊन उत्तीर्ण झाला. याच दरम्यान त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली,

एमपीएससी मार्फत निघणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून निवडला गेला. हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नक्कीच नव्हता. हक्काचा आधार नसला तरी त्याची स्वप्ने धाडसी होती. ती पूर्ण करण्यासाठी त्याने मेहनत घेतली. त्याच मेहनतीचे हे फळ आहे.

Share This Article