चारवेळा अपयश आले, खचून न जाता यतीनने मारली उपजिल्हाधिकारी पदावर मजल
MPSC Success Story आपल्याला कोणतेही अपयश आले की आपण खचून जातो. पण हेच अपयश पचवण्याची ताकद देखील हवी. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना अशा अनेक अपयशांना सामाना करायला लागतो. सगळ्यांनाच पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही तर काहींना यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. तसेच, यतीनला देखील चारवेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारूनही अपयश आले. तरी त्यातून खचून न जाता त्याने अभ्यास केला. अखेर, राज्यसेवा २०२२ साठी उपजिल्हाधिकारी पदासाठीच्या निवड यादीत त्याला स्थान मिळाले आहे.
यतीन पाटील हा मूळचा जळगावच. त्याचे वडील रमेशचंद्र पाटील भोसला शाळेत शिक्षक आहेत. तर आई विमल पाटील गृहिणी आहेत. यतीनचे शालेय शिक्षण मराठा हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षक आरवायके विज्ञान महाविद्यालयात झाले.गणित विषयात बी.एस्सीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातून एम.एसस्सी. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. यानंतर सेट-नेट परीक्षांमध्ये यश मिळविल्यानंतर सहाय्यक प्राध्यापक पदावर खासगी शैक्षणिक संस्थेत नोकरीला सुरवात केली. पण त्याला सरकारी अधिकारी बनायचे होते. त्यामुळे त्याने नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.सातत्याच्या जोरावर यतीनने अभ्यास सुरू ठेवला.
चारवेळा ‘एमपीएससी’ परीक्षेच्या मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली.पण तरीही अपयश आले. अपयश पचवायची क्षमता असेल, तर यशस्वी होण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही, ही बाब यतीन रमेशचंद्र पाटील याने सिद्ध करून दाखविली आहे. कोरोनाकाळातही तयारीत सातत्य ठेवताना अखेर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये त्याने यशाला गवसणी घातली आणि उपजिल्हाधिकारी पदासाठीच्या निवड झाली.