⁠
Jobs

राज्यात लवकरच १० हजार जम्बो पोलिस भरती

Maharashtra Police Bharti 2020

एकूण १० हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे आणि ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश

राज्यातील पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस शिपाई संवर्गात १० हजार जागा भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात शहरी आणि ग्रामीण तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.

याशिवाय नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या बटालियनसाठी 1384 पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात 461 प्रमाणे 3 टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे आणि ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ मंजूरीनंतर भरती प्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button