आपली परिस्थिती कोणतीही असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशाची पायरी गाठता येतेच. हेच प्रेरणा हिने करून दाखवले आहे. प्रेरणा हिचे वडील घरची शेती बघून खाजगी बसवर चालक म्हणून काम करतात तर आई अनिता या गृहिणी असून टेलरिंगचा व्यवसाय करतात. शेती व एकूणच परिस्थिती तशी बेताचीच असल्याने आर्थिक सुबत्ता नव्हती. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक इथली ही लेक.
प्रेरणाचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक येथे झाले आहे. बारावीनंतर पारगाव येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेत तिने प्रवेश घेत पोलिस भरतीची तयारी सुरू केली.पोलीस भरतीसाठी या तरुणांचे आकर्षण वाढताना दिसतय. कौतुकास्पद बाब म्हणजे आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करत मुले मोठ्या पदांवर नोकरी मिळवू लागली आहेत, तर काही जण लहान वयातच शिक्षण पूर्ण करून पोलीस भरतीमध्ये जात आहेत.
हिने देखील हे स्वप्न उराशी बाळगले. सतीश अरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजपथ करिअर अकॅडमीच्या माध्यमातून तिने पोलिस भरतीची तयारी सुरू ठेवली.वयाच्या १९ व्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या पोलिस भरतीत पहिल्याच प्रयत्नात पुणे ग्रामीण पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून तिची निवड झाली आहे.शेतकरी कुटुंबातील मुली जिद्दीने शिक्षणात आपला ठसा उमटवताना दिसू लागली आहेत.