⁠  ⁠

पर्यावरणशास्त्राची तयारी

Dr. G. R. Patil
By Dr. G. R. Patil 8 Min Read
8 Min Read

डॉ. जी. आर. पाटील
सुधारित राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या सामान्य अध्ययनाच्या पेपर-१ मध्ये पर्यावरणशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा घटक अंतर्भूत करण्यात आला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर-१ मध्ये भूगोलाच्या अभ्यासक्रमातही पर्यावरणाचा स्वतंत्र उपघटक आहे.

पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने..
या विषयांतर्गत पर्यावरणाचा अर्थ व व्याप्ती, पर्यावरणविषयक कायदे, पर्यावरण क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती व पुरस्कार, परिस्थितीकी, परिसंस्था, जैवविविधता, जैवविविधतेचा ऱ्हास व संवर्धन, वातावरणीय बदल हे महत्त्वाचे घटक आहेत.

मुख्य परीक्षेच्या दृष्टीने..

* पर्यावरण परिसंस्था, ऊर्जा, अन्नसाखळी, पर्यावरण उन्नती व संधारण. वैश्विक पर्यावरणीय असंतुलन, प्रदूषण, जागतिक तापमान वृद्धी, जैवविविधतेत घट, पर्यावरणीय फायदे, क्योटो परिषद, कचरा व्यवस्थापन, CR2-1, CR2-2..

* परिसंस्थेच्या प्रकार- उदा. भूपृष्ठीय परिसंस्था, जलीय परिसंस्था, भारतातील गवताळ परिसंस्था, हिमालय परिसंस्था, परिसंस्था ऱ्हास व कारणांचा सविस्तर अभ्यास करावा.

* जैवविविधता – जैवविविधता हा पर्यावरणशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यात खालील घटकांचा अभ्यास करावा- जैवविविधता संकल्पना, जैवविविधता हॉटस्पॉट्स, भारतातील जैवविविधता, महाराष्ट्रातील वन्यजीवन, धोक्यात आलेल्या प्रजाती, त्यांचे वर्गीकरण, जैवविविधता संवर्धन, भारतातील जीवावरण संरक्षण परिक्षेत्र, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, भारतातील महत्त्वाची अभयारण्ये, जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेली रूपके, जैवविविधता संवर्धनासंबंधी महत्त्वाचे करार अभ्यासावेत.

या अभ्यासासोबत आणखी काही उपघटकांचा अभ्यास राज्यसेवा मुख्य परीक्षा व यूपीएससी पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त ठरतो. ते उपघटक पुढीलप्रमाणे आहेत- वातावरणीय बदल, हरितग्रह परिणाम व जागतिक तापमानवाढ, तापमानवृद्धी व भारत, आंतरराष्ट्रीय करार -पोटा परिषद, क्योटो प्रोटोकॉल, ओझोन थराचा क्षय, ओझोन क्षयाची कारणे, मॉट्रियल प्रोटोकॉल, आम्ल पर्जन्य, आम्ल पर्जन्याचे परिणाम.

महत्त्वाच्या संकल्पना
* बायो रेमिडिएशन- मानवी हस्तक्षेपामुळे अनेक जैविक परिसंस्था प्रदूषित होतात. या परिसंस्था मूळस्थितीत आणणे आवश्यक असते. प्रदूषित झालेल्या परिसंस्थांना जैविक साधनांचा वापर करून पुन्हा मूळ स्थितीत आणून पर्यावरणाची हानी भरून काढण्याची प्रक्रिया म्हणजे बायो रेमिडिएशन होय. बायो रेमिडिएशन प्रक्रियेत जैविक साधनांचा वापर करून प्रदूषके पूर्णपणे नष्ट केली जातात किंवा त्याचे रूपांतर हानीकारक नसणाऱ्या किंवा कमी हानीकारक पदार्थामध्ये केले जाते. यामध्ये निर्सगात आढळणारे जीवाणू – बुरशी आणि वनस्पतींचा मनुष्यास हानीकारक असणाऱ्या प्रदूषकांचे विघटन करणाऱ्यांसाठी वापर केला जातो.

बायो रेमिडिएशनच्या दोन प्रकारच्या पद्धती आहेत-
* इनसिटू (In-Situ)- या प्रक्रियेत मूळस्थानीच प्रदूषकांवर प्रक्रिया केली जाते. ही सर्वात महत्त्वाची बायो रेमिडिएशन पद्धत स्वस्त आणि कमी हानी करणारी पद्धत आहे.

* एक्स सिटू (Ex-Situ)- या पद्धतीत सर्वप्रथम प्रदूषित पदार्थ वेगळे केले जातात. त्यांना मूळ स्थानापासून दूर नेले जाते. या प्रदूषकांवर जैविक साधनांचा वापर करून त्यांचे विघटन केले जाते.

* दलदलीय परिसंस्था (Wetlands)- दलदलीय परिसंस्थांमध्ये विविध वनस्पती, वृक्ष आणि जलप्राण्यांचा अधिवास असतो. या परिसंस्थांची उत्पादकताही सर्वात जास्त असते. स्थलांतर करणाऱ्या बहुतेक प्रजाती दलदलीय परिसंस्थेवर अवलंबून असतात. दलदलीय परिसंस्थेतील अन्नाची उपलब्धता, वनस्पतींचे आच्छादन आणि जमिनीवरील भक्षकांपासून मिळणारे संरक्षण यामुळे पाणपक्ष्यांसाठी हे उत्तम निवासस्थान आहे. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे या परिसंस्थांची अतोनात हानी होत आहे. अनेक परिसंस्था नष्ट होत आहेत. त्यामुळे जगातील जैवविविधता संपन्न या परिसंस्थांचे सवंर्धन करणे आवश्यक आहे.

* रामसर करार- हा करार दलदलीय परिसंस्थांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी करण्यात आलेला आहे. इराणमधील रामसर या शहरात २ फ्रेबुवारी १९७१ मध्ये हा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला आणि १९७५ पासून अमलात आला.

* जैवविविधता हॉट स्पॉट- १९८८ मध्ये नॉर्मन मेअर या संशोधकाने सर्वप्रथम ही संकल्पना मांडली. जैवविविधता हॉट स्पॉट (जैवविविधता धोक्यात येऊ शकेल असे जैवविविधतेचे संपन्न प्रदेश) असतात. भारतातील चार जैवविविधता हॉट स्पॉटस् म्हणजे हिमालय, इंडो-म्यानमार, पश्चिम घाट, अंदमान व निकोबार. हे चारही हॉट स्पॉट भारतात अंशत: वसलेले आहेत. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे ती म्हणजे जैवविविधता हॉट स्पॉटस् परिसंस्थेवर आधारित प्रदेश आहेत. एकच जैवविविधतेचा हॉट स्पॉट एकापेक्षा अधिक देशांमध्ये विस्तारलेला असू शकतो.

* कार्बन सिंक्स- वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड हा महत्त्वाचा घटक आहे. कार्बनडाय ऑक्साइडमुळे पृथ्वी उबदार राहण्यास मदत होते. जर वातावरणात कार्बनडाय ऑक्साइड नसता तर पृथ्वी थंड गोळा झाली असती. मात्र वातावरणात एका ठरावीक प्रमाणात वाढलेला कार्बनडाय ऑक्साइड वातावरणासाठी घातक ठरू शकतो. वातावरणामध्ये विविध स्रोतांमध्ये उत्सर्जति होणारा कार्बनडाय ऑक्साइड वातावरणात तसाच साठून राहत नाही. त्यातील बराचसा कार्बनडाय ऑक्साइड वातावरणातील काही घटकांकडून शोषला जातो. कार्बन सिंक्स म्हणजे पर्यावरणातील असे घटक, जे उत्सर्जति केलेल्या कार्बनडाय ऑक्साइडचे शोषण करतात.

पर्यावरणातील महत्त्वाचे कार्बन सिंक्स : महासागर- बराचसा कार्बनडाय ऑक्साइड हा सागरी पाण्यात विरघळतो. वने व फायटोप्लँक्टन, ध्रुवीय प्रदेशात असणारे हिमनग.

* राष्ट्रीय हरित न्यायालय (National Green Tribunal)- पर्यावरणाविषयी वाद किंवा दावे हाताळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विशेषतज्ज्ञांचा समावेश असणारी ही संस्था आहे. मात्र कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर १९०८मध्ये नमूद केलेली कार्यपद्धती या न्यायपीठाला लागू असत नाही. या न्यायालयाची स्थापना राष्ट्रीय हरित न्यायासन कायदा २०१० अंतर्गत १८ ऑक्टोबर २०१० रोजी करण्यात आली. या न्यायालयावर खटले निकालात काढण्यासाठी अमूक एका कालावधीचे कायदेशीर बंधन नसते. मात्र हे खटले सहा महिन्यांच्या आत निकालात काढण्यासाठी हे न्यायालय सर्वतोपरी प्रयत्न करते. या न्यायालयाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून भोपाळ, पुणे, कलकत्ता व चेन्नई येथे खंडपीठे आहेत.

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था
* बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS): ही संस्था १८८३ मध्ये मुंबईत सुरू झाली. वन्यजीव संशोधनासाठीची ही सर्वात जुनी स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेतर्फे हॉर्नबिल, जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री मासिके प्रसिद्ध होतात. पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली या संस्थेशी संबंधित होते.

* बॉटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया (BSI):
ही संस्था १३ फेब्रुवारी १८९० मध्ये कोलकाता येथे सुरू झाली. १९३९ साली बंद झालेली ही संस्था पुन्हा १९५४ मध्ये सुरू करण्यात आली. कार्य : देशातील विविध भागांतील वनस्पतींचा अभ्यास, संशोधन व संवर्धनासाठी उपाय सुचवणे. पुणे, डेहराडून, कोईमतूर, शिलाँग, अलाहाबाद, जोधपूर, पोर्ट ब्लेअर, इटानगर व गंगटोक येथे कार्यालये आहेत.

* झुऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया: स्थापना- १ जुल १९९६. कार्य – भारतातील विविध प्राणी-प्रजातींचा अभ्यास करणे, विविध प्राण्यांचे नमुने गोळा करणे, अभ्यास-संशोधन करणे, जतन करणे, प्राण्यांचे वर्गीकरण व पर्यावरणासंबंधी मूलभूत संशोधन करणे. १० लाख नमुन्यांसह आशियातील सर्वात मोठा संग्रह या संस्थेत आहे.

* सेंटर फॉर सायन्स अण्ड एन्व्हायर्नमेंट (CSE) : नवी दिल्लीच्या या संस्थेचे कार्य : विविध प्रकाशनांद्वारे पर्यावरणविषयी जनजागृती, शाश्वत व समान विकासासंबंधी कार्य, भारतीय पर्यावरणाची स्थितीविषयक संशोधन प्रकल्प प्रसिद्ध. भारतीय नागरिकांची सनद प्रकाशित. ‘डाऊन टू अर्थ’ हे विज्ञान पर्यावरणासंबंधी पाक्षिक.

* सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट: ही संस्था पुण्यात आहे. कार्य – संशोधन, अन्वेषण, जनमत निर्मिती, आंदोलने, निसर्ग परिभ्रमण, शाळा-महाविद्यालयांत दृक्श्राव्य कार्यक्रम, व्याख्याने, पर्यावरण शिबिरे या कार्यक्रमांचे आयोजन. राष्ट्रीय स्तरावर जैवविविधता धोरण तयार करण्यात या संस्थेचा सक्रिय सहभाग असतो.

* डॉ. सलीम अली सेंटर फॉर ऑíनथॉलॉजी अ‍ॅण्ड नॅचरल हिस्ट्री : ५ जून १९९० कोईमतूर येथे संस्थेची स्थापना झाली. संस्थेतर्फे जैवविविधतेसंबंधित विविध क्षेत्र प्रकल्प हाती घेतले जातात.

* केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) : कायदा, १९७४ अन्वये संस्थेची स्थापना सप्टेंबर १९७४ मध्ये दिल्लीत झाली. या संस्थेला वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९८१ अन्वये अधिकार प्रदान करण्यात आले. ही संस्था जल व वायू प्रदूषण नियंत्रणासंबंधात कार्य करते.

(सदर लेख डॉ. जी. आर. पाटील यांनी दैनिक लोकसत्ताच्या करिअर वृत्तान्त या सदरात लिहला आहे. दैनिक लोकसत्ताच्या संकेतस्थळावर आधी प्रसिध्द झाला आहे. तुमच्या प्रतिक्रिया लेखकाला [email protected] या मेल पाठवू शकता.)

विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

TAGGED: ,
Share This Article