PSI Success Story : जर स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असेल तर संधी ही मिळतेच. सुरेखा यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर काही दिवस शिक्षिका म्हणून नोकरी केली पण वर्दीचे स्वप्न स्वस्त बसून देत नव्हते. म्हणून, त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.
हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नक्कीच नव्हता. त्यांनी संसार सांभाळत ही मेहनत घेतली.अखेर, त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२०च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण होऊन यशाला गवसणी घातली. यामुळेच त्यांची पी. एस.आय पदी निवड झाली असून महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
सुरेखा बिडगर यांचे शिक्षण उसवाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण चांदवडच्या नेमिनाथ शिक्षण संस्थेत तर एफ.वाय मध्ये असताना २००६ मध्ये प्रशांत शेळके या अभियंत्यासोबत लग्न झाले. लवकर लग्न झाले तरी एस. वाय नंतर त्यांचे शिक्षण पतीच्या पाठिंब्यामुळे पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी २०१३ मध्ये बी.एड पूर्ण करून सन २०१५ मध्ये शिक्षक म्हणून पी एन नाईक शिक्षण संस्थेत नोकरीला प्रारंभ केला. मात्र त्यांना वर्दीचे आकर्षण स्वस्त बसू देत नसल्याने, रात्रंदिवस वाटत होते की, मी वर्दीमध्ये दिसले पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट करून अखेर राज्यसेवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचे ठरवले.
यासाठी दररोज त्या घर सांभाळून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायच्या, विविध नोट्स काढून सराव करायच्या या सगळ्यांत त्यांना घरच्यांचा पाठिंबा होता. त्यामुळेच, त्यांचे हे वर्दीचे स्वप्न पूर्ण झाले.