खरंतर प्रत्येकाचे आईवडील हे आपल्या मुलांसाठी सातत्याने कष्ट करत असतात. आपल्या मुलांनी शिकावे आणि उच्च शिक्षित होऊन नाव कमवावे ही त्यांची प्रांजळ अपेक्षा असते.तसेच, क्षितीजा चव्हाणच्या आई – वडिलांनी देखील लेकीला अगदी हलाखीच्या परिस्थितीतून शिकवले. मावळ तालुक्यातील लहानशा गावात तिची जडणघडण झाली.
क्षितीजा ही देखील अभ्यासात पहिल्यापासून हुशार होती. तिने नवीन समर्थ विद्यालयातून माध्यमिक शिक्षक घेतले. तर उच्च माध्यमिक शिक्षण इंद्रायणी विद्यालयातून घेतले. बारावी नंतर क्षितीजाने आपण पोलिस बनायचं हे स्वप्न उराशी बाळगून प्रवास सुरू केला. तिच्या आई – वडिलांनी देखील या संपूर्ण प्रवासात तिला मोलाचे प्रोत्साहन दिले.वडील शिवाजी चव्हाण आणि आई शोभा चव्हाण यांनी लेकीला अगदी हलाखीच्या परिस्थितीतून शिकवले.
कातवी गावचे शिवाजी चव्हाण हे नोकरी व्यवसाय करुन घर चालवतात, तर शोभा या गृहिणी आहे. आपल्या लेकीने इतरांपेक्षा अधिक वेगळं काही करुन स्वतःच्या पायावर उभे रहावे, असे त्यांना नेहमी वाटत. त्यामुळेच त्यांनी तिच्या शिक्षणात कधीही काहीही कमी पडू दिले नाही. तिने देखील ही जाणीव राखून ठेवली. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच शौर्य करियर अकादमी इथे अभ्यास आणि सराव सुरु केला. तब्बल तीन वर्षे क्षितीजाने यासाठी कठोर मेहनत घेतली.
अखेर तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे स्वप्न साकार झाले आणि ती मुंबई पोलिस दलात सिलेक्ट झाली. हे खऱ्या अर्थाने आई वडिलांच्या कष्टांचे योग्य चीज करत लेक आज पोलिस दलात सिलेक्ट झाल्याने त्यांचीही मान अभिमानाने उंचावली आहे. गावाकडच्या मुलींसाठी हा नक्कीच प्रेरणादायी प्रवास आहे. त्यामुळे, परिस्थितीवर मात करता येते फक्त स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली पाहिजे.