लहानपणी बघितलेले स्वप्न झाले साकार; सोनल सूर्यवंशीची उपजिल्हाधिकारी पदी निवड!
MPSC Success Story आपले जर स्वप्न निश्चित असेल तर कोणत्याही परिस्थितीत यशाचा मार्ग मोकळा करता येतो. असेच सोनल सूर्यवंशी हिने एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे.
सोनल ही मूळची माण तालुक्यातील असून तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. लहानपणापासून हुशार आणि अभ्यासाची आवड असल्याने तिची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. तिकडेच तिचे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण झाले. शिक्षणाच्या निमित्ताने बराच काळ घराबाहेर होत्या.तर, पुढे तिने बी.टेकचे शिक्षण घेतले. या दरम्यानच्या काळात तिला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. ऑगस्ट २०१९ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या संदर्भात मार्गदर्शन मिळावे म्हणून तिने पुणे गाठले. मात्र तयारीला सुरुवात केली आणि कोव्हिडची लाट आली.
त्यामुळे तिला घरी परत यावे लागले. संपूर्ण शिक्षण बाहेर झाले असल्याने घरी अभ्यासाची सवय नव्हती त्यामुळे घरून अभ्यास करणं जास्त आव्हानात्मक होतं. पण तिने वेळेचे आणि अभ्यासाचे अचूक नियोजन केले. पण ती पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचली. सहा मार्कांनी माझं पद हुकलं. त्या अपयशातून धडा घेतला आणि आणखी जोमाने अभ्यास केला. मुख्य परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवणं आणि उजळणी अतिशय महत्त्वाची आहे हे तिच्या लक्षात आले. अभ्यास किती करतो यापेक्षा कसा करतो हे महत्त्वाचे असते.
हा तिने यशमंत्र लक्षात ठेवला. यात तिच्या कुटुंबाचा मोठा हातभार आहे. या संपूर्ण प्रवासात तिने सावित्रीबाई फुले यांना आपले प्रेरणास्थान मानले. कठीण परिस्थितीत देखील मार्ग काढता येतो. यासाठी तिने अभ्यासातून यशाचा मार्ग काढला. अखेर, तिच्या कष्टाचे चीज झाले असून सोनलची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे.