मुलाचा सांभाळ करत स्नेहाने घेतली गगनभरारी! झाली फौजदार
एकेदिवशी कौटुंबिक अडचणींमुळे स्नेहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेली. तिथे तिने एक महिला बघितली. त्या महिलेस सारेजण सॅल्युट करत आहेत. हाच क्षण स्नेहाच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला आणि तिने फौजदार होण्याचा निश्चय केला.
पुणे जिल्ह्यातील वडारवाडी वस्तीमध्ये लहानाची मोठी झालेल्या स्नेहाने समजातील समस्या जवळून बघितल्या आहेत. या भागात अजूनही सामाजिक व शैक्षणिक जाणीवांचा अभाव आहे. तसेच स्नेहाचे पण कमी वयात लग्न लावून दिले गेले. त्यानंतर तिला बाळ झाले. त्यामुळे, शिक्षणाची भूक असूनही पूर्ण करता आली नाही.
बारावीत असतानाच लग्न लावून दिल्यामुळे तिच्यावर कमी वयात बऱ्याच जबाबदाऱ्या पडल्या. कालांतराने काही कारणास्तव लग्न देखील मोडले आणि लेकरांच्या जबाबदारीची अधिक जाणीव झाली. मग तिने ठरवले की आता शासकिय अधिकारी होणारच आणि परिस्थितीवर मात करणार…
तिने २०१८ ला पुणे विद्यापीठातून बी.कॉम पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यासोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला.लहान मुलाला घरी आई वडिलांकडे ठेऊन ती अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी जायची. स्वतःचं शिक्षण, मुलाचे शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदारी या सर्व बाजू हिंमतीने पार पाडल्या. सातत्याने अभ्यास व मैदानी सराव करून स्नेहाने एमपीएससीची परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात पीएसआय परीक्षा पास झाली.
मित्रांनो, आपण जर निश्चय केला तर कोणतीही गोष्ट सहज शक्य होऊ शकते. फक्त जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी हवी.