Success Story एकदा लग्न झाले की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जमेल का? घर – नोकरी सांभाळून कसा करता येईल? असे एक ना अनेक प्रश्न कित्येक जणांसमोर असतात. त्यासाठी आडभाई दांपत्यांची गोष्टी प्रेरणादायी आहे. डॉ. अमोल देविदास आडभाई व डॉ. ज्ञानेश्वरी भांड – आडभाई हे नाशिक जिल्ह्यातील सायखेडा येथे राहणारे हे दांपत्य. त्यांचे घराणे हे प्रगतशील कुटुंब म्हणून ओळखले जाते.
डॉ. अमोल आडभाई यांनी जनता इंग्लिश स्कूल व ज्यूनियर कॉलेज सायखेडा, ता. निफाड, जि. नाशिक येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ (सातारा) येथून पशुवैद्यकीय शिक्षण तसेच नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल, हरयाणा येथून पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. डॉ. ज्ञानेश्वरी हिने जिल्हापरिषद प्राथमिक शाळा खळी, ता. संगमनेर येथून प्राथमिक तर सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक विद्यालयातून माध्यमिक तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन आश्वी खुर्द येथून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले आहे. याव्यतिरिक्त क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ (सातारा) येथून पशुवैद्यकीय शिक्षण पदवी देखील प्राप्त केली आहे.
डॉ. अमोल आणि ज्ञानेश्वरी हे दोघे फेब्रुवारी २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकले. डॉ. ज्ञानेश्वरी हिचे माहेर संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द हे आहे तर सासर नाशिक जिल्ह्यातील सायखेडा हे आहे. घर सांभाळून दोघांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. कुटुंबांचे पाठबळ व एकमेकांची साथ यामुळे त्यांच्या यशाची वाट सुकर झाली.
वर्ष २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डॉ. ज्ञानेश्वरी व डॉ. अमोल यांनी उत्तीर्ण होण्याची किमया साधली आहे. लग्नानंतर डॉ. ज्ञानेश्वरी हिने पहिल्या तर डॉ. अमोल यांनी दुसऱ्या प्रयत्नात अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या जोरावर यश मिळवले आहे. त्यामुळे या दोघांची शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.हा पती – पत्नींचा प्रवास हा तरूणवर्गासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.