हमालाच्या मुलाची रेल्वेत गगनभरारी !
वडील हमाली कामगार, आर्थिक परिस्थिती बेताची, घरचे कर्ज आणि शेती-ना कुठली बँकेत ठेव. अशा परिस्थितीत देखील अक्षय बबनराव गलांडे यांची सेंट्रल रेल्वे बोर्डात निवड झाली आहे. अक्षय हा कुटुंबातील सगळ्यात धाकटा मुलगा. अक्षयला कुटुंबाचे रहाटगाडगे चालविताना वडिलांची होणारी होणारी दमछाक अस्वस्थ करत होती. त्याचे वडील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालीचे काम करतात.
घर चालविण्यात आपला देखील वाटा असावा म्हणून त्याने देखील वडिलांप्रमाणे एका खाजगी ट्रेडर्स वर मिळेल ते काम करायला सुरवात केली. खर्च भागविण्याइतपत मिळकत नसल्याने आता त्याने दुहेरी शिफ्टमध्ये काम करायला सुरुवात केली. अक्षय हा अत्यंत हुशार मुलगा होता. त्याने दहावीमध्ये ७५ टक्के तर बारावीत ५३ टक्के मिळाले. सकाळी शाळा दुपारी खाजगी ट्रेडर्स वर काम, रात्री पुन्हा मिळेल ते काम हा दिनक्रम ठरलेला असायचा.
त्यांने परिस्थितीची जाण ठेवून मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्या वेळात लायब्ररी जॉईन करण्याचा सल्ला मित्रांनी दिला. याकरिता वेळेचे नियोजन करण्यात आले. अशातच सेंट्रल रेल्वे मुंबई तर्फे २०१९ घेण्यात आलेल्या महाभरतीमध्ये पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरला. इच्छाशक्ती खंबीर असेल आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याची तयारी असेल, तर कोणतीही व्यक्ती सर्वात मोठे ध्येय गाठत मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकते.