अनिकेतला खेळाची प्रचंड आवड….त्याने शालेय जीवनापासून खेळाच्या संबंधित विविध स्पर्धा गाजवल्या. त्याने राज्यस्तरीय वुशू व बॉक्सिंग खेळात पाच वेळा सुवर्ण पदक पटकावले आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करुन त्याने अनेक पदके जिंकली आहेत.
तो फक्त खेळात हुशार नसून अभ्यासात देखील हुशार असल्याने त्याने महाराष्ट्र नगरपरिषद कर व प्रशासकीय सेवा मधून कर निर्धारण व प्रशासकीय सेवेची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली.
अनिकेत सुधीर शिंदे हा आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील शेतकऱ्याचा मुलगा…त्याचे वडील सुधीर सखाराम शिंदे हे एक प्रगतशील शेतकरी आहेत. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण हे गावातीलच विद्या विकास मंदिर विद्यालयात झाले.उच्च माध्यमिक शिक्षण सैनिकी शाळा (फुलगाव) येथून झाल्यानंतर त्याने पुणे शहरातील सर परशुराम महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. त्याने खेळासोबत स्पर्धा परीक्षेचा देखील अहोरात्र अभ्यास केला.
दोन – तीन वर्षांच्या मेहनतीनंतर त्याची महाराष्ट्र नगरपरिषद कर व प्रशासकीय सेवा मधून कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदी निवड झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऑक्टोबर २०२३ मधे ही परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे सोमवार (दि. १०) जून रोजी लागला. त्यात त्याने बाजी मारली.