Success Story : आपल्याकडे मेहनत करायची तयारी असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करत यशाची पायरी चढता येते. ओझर येथील मरिमाता गेट येथे राहणाऱ्या अपूर्वा वाकोडे हिने करून दाखवले आहे. तिची पोलिस भरतीत पुणे शहर पोलिस दलात वाहनचालक पदावर निवड झाली असून, ती मुलींमध्ये पहिली आली आहे.
अपूर्वाच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची,लोकांच्या घरी जाऊन धुणीभांडी करते. अपूर्वादेखील आईला या कामात मदत करते. काम करूनच तिने बी. कॉमचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने एका कंपनीच्या माध्यमातून तिने मोटार ड्रायव्हिंग क्लास पूर्ण केला होता.
या प्रशिक्षणानंतर तिने पोलिस वाहनचालक पदासाठी फॉर्म भरला होता. इतकेच नाहीतर, पुढे तिने दोन लहान भावांनाही शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन दिले. तर अपूर्वाचा ज्या दिवशी पोलिस भरतीचा लेखी पेपर होता, त्याच दिवशी तिचे वडील नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. टेलरकाम करणारे राजू वाकोडे यांना पंधरा दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक झाला होता. याही स्थितीत अपूर्वाने जिद्द न सोडता लेखी परीक्षा दिली. पेपर देऊन संध्याकाळी घरी पोहचताच वडिलांनी जगाचा निरोप घेतला. पण तिने आईच्या कष्टाची जाणीव ठेवली. अपूर्वा वाकोडे पोलिस भरती उतरली आणि नुसती पासच झाली नाही, तर पुणे शहर पोलिस दलात ती मुलींमध्ये प्रथम आली.
मित्रांनो, जिद्द आणि चिकाटी, मेहनत करण्याची तयारी हे त्रिसूत्री असेल तर यश नक्कीच मिळते. पण या प्रवासात खचून गेले तर चालणार नाही.