वडिलांचे स्वप्न केले पूर्ण ; एस.टी वाहकाच्या मुलीची कृषी उपसंचालक पदी निवड!
MPSC Success Story : आपल्या आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे, हा सगळ्या मुलांच्या पुढे ध्यास असतो. हाच ध्यास मनाशी बाळगून तिने देखील अभ्यास केला आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. चैताली शिंदे ही पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील रहिवासी. तिचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण करकंब येथील जिल्हा परिषदेच्या मुली नंबर दोन शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेत झाले आहे. तिने पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतही गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते.
त्यानंतर तिला आईने सर्वप्रथम स्पर्धा परीक्षेची ओळख करून दिली. एस.वाय बीएपर्यंत शिकलेल्या आईने लहानपणापासून चैतालीच्या अभ्यासाकडे लक्ष्य देत तिच्या मनामध्ये अधिकारी होण्याची ज्योत पेटवली होती.मग शाळेतील शिक्षकांनी देखील मार्गदर्शन केले.भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वर्ग एकचा अधिकारी होण्याबाबत सुचविले होते. त्यामुळे कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयातून बीएस्सी ॲग्रीची पदवी घेतल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात एमएस्सी ॲग्रीसाठी प्रवेश घेतला.
तिने महाविद्यालयीन शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा असा मेळ घालत अभ्यासाचे नियोजन केले.पूर्व, मुख्य व मौखिक अशा तिन्ही परीक्षांचा टप्पा पार करत वर्ग एकचे पद मिळविले आहे.यामुळे चैतालीची जिल्हा कृषी उपसंचालकपदी निवड झाली. इतकेच नाही तर चैताली ही अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात तिसरी आली आहे.जेव्हा गावातील मुलगी असे यश मिळवणे तेव्हा अनेकांना कळत – नकळतपणे प्रेरणा मिळत जाते. तिच्या यशाने आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.