आपल्या आयुष्यात यश – अपयश या गोष्टी कायम येत असतात. पण यातून मार्ग काढता आला पाहिजे. करवीर तालुक्यातील छोट्याशा गणेशवाडी गावचे दादासो मधुकर माने याच्या यशाची कहाणी ही अनेकांना नव्याने उभे राहण्यासाठी महत्त्वाची आहे.दादासो याचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. मग पुढे, राजाराम कॉलेज येथून ५६% गुणांनी बारावी उत्तीर्ण झाले. बारावीनंतर त्यांनी सैन्यदलात भरतीसाठी प्रयत्न सुरु केला. पण त्यात दोन वेळा अपयश आले. पुढे मेन राजाराम कॉलेज येथून सन २०१२ ला भूगोल विषयातून पदवी संपादन केली.
महाविद्यालयीन शिक्षण दरम्यान त्याने ठरवले होते की आपण अधिकारी व्हायचे. यासाठी त्याने अहोरात्र मेहनत घेतली. फक्त अभ्यास केला नाही तर मैदानी सराव देखील केला. पुढे, सिंधुदुर्ग पोलिस भरतीत दोन गुण कमी पडले. निराश न होता त्यांनी २०१५ साली कोकणातून पुन्हा कोल्हापूर गाठले व पीएसआय पदाचा कर अभ्यास सुरु केला.
पुन्हा सलग चार वेळा मुख्य परीक्षेस अपयश येऊन देखील अपयश पचवून पाचव्यांदा ८ ऑक्टोबर २०२२ ची पूर्व परीक्षा मोठ्या आत्मविश्वासाने दिली. मुख्य परीक्षा २ ऑक्टोबर २०२३ मध्ये झाली.१६ जुलै २०२४ रोजी मुलाखती झाल्या. अखेर, दादासो माने याच्या अथक प्रयत्नांना यश आले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट (ब) मुख्य परीक्षा २०२२ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे.