आयुष्यात आपल्याला कधी यश मिळते तर कधी अपयश या सर्व परिस्थितीत जिद्दीने उभे राहता आले पाहिजे. आपले स्वप्न कोणतेही असले तरी जिद्द ही कायम लढायला बळ देते.तसेच डॉ. डॉ. स्नेहल ज्ञानोबा वाघमारे यांना परीक्षेत तीनवेळा मुलाखतीपर्यंत जाऊनही यश हुलकावणी देत होते. मात्र, खचून न जाता जिद्दीने प्रयत्न केले आणि त्यांनी यावेळी यश मिळविलेच.
त्यांची रँक ९४५ वी आहे.मूळचे चांदेगाव (ता. उदगीर) येथील रहिवासी आणि सध्या गडचिरोली येथे असिस्टंट कमांडंट या पदावर कार्यरत आहेत.डॉ. स्नेहल यांचे वडील ज्ञानोबा वाघमारे हे मुंबईतील डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्रातून फोरमेनपदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत. आई गृहिणी असून विवाहित बहीण बीई (इलेक्ट्रॉनिक्स) आहे. त्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती.
स्नेहलने लातूरच्या दयानंद महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यावेळी मागासवर्गीयांमध्ये राज्यात ते प्रथम आले होते. याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. पुढे ‘एमबीबीएस’ची पदवी मिळविल्यानंतर २०२३ मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) मध्ये असिस्टंट कमांडंट या पदावर नियुक्ती झाली. तरी देखील त्यांनी युपीएससी परीक्षेचा अभ्यास चालूच ठेवला.
दररोज सहा ते आठ तास अभ्यास केला. ते दरवेळी प्रयत्न करत होते पण यश येत नव्हते. ते तीनवेळा मुलाखतीपर्यंत पोचूनसुद्धा अंतिम यादीत नाव न आल्याने निराश होते. त्यावेळी त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नजरेसमोर यायचे. यातून प्रेरणा मिळवत पुन्हा अभ्यास करायचे. अखेर या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.