गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या भागात काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्या ठिकाणी काम करणं हे धाडसाचे देखील असते. असेच शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, लहानपणापासून गरिबीमध्ये काढलेल्या इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी क्षेत्रात नक्षलवाद्यांच्या विरोधातील काम उल्लेखनीय आहे.
त्यांच्या घरची परिस्थिती बेताची, दोन भाऊही शिक्षण घेत होते…आईवडील शेतकरी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पण घरच्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठिंबा दिला.त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दामाजी कारखाना, माध्यमिक शिक्षण, श्री. विलासराव देशमुख प्रशाला, कारखाना, उच्च माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज मंगळवेढा इथून पूर्ण केले तसेच स्वेरी कॉलेज, गोपाळपूर येथून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकी पदवी प्राप्त झाल्यानंतर पुणे येथील भोसरी एमआयडीसीमध्ये नामांकित कंपनीत नोकरी मिळाली.
पण या खाजगी कंपनीत मन रमले नाही त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.खाजगी कंपनीतील नोकरीचा राजीनामा देऊन संपूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेला देण्याचा निर्णय घेतला.सन २०१३ साली पीएसआय परीक्षेचा फॉर्म भरला आणि पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांना मुख्य परीक्षा मध्येही चांगले गुण मिळाले. शारीरिक चाचणी व मुलाखतीचे जोरदार तयारी करून अंतिम यादीमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली.आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करत पोलीस क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.