पदरी आर्थिकदृष्ट्या निराशा…कोरडवाहू शेतजमीन यावर संपूर्ण कुटुंबाची उपजीविका तरी प्रवीण सातारकरने वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील छोट्याशा दापुरा गावातील एका गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द व कठोर परिश्रमाने एमबीबीएसची पदवी घेऊन परीक्षा उत्तीर्ण होऊन गावातील पहिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.
प्रवीणचे वडील जगदिश शालीग्राम सातारकर अल्पशिक्षित शेतकरी असून आई कविता अशिक्षित आणि गृहिणी आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. आई वडिलांसह मोठा भाऊ सचिन सातारकर शेती सांभाळतो. प्रवीणने इंग्रजी विषय घेऊन पदवी संपादन केली. शेतीची कामे करून व बसने ये-जा करून अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्याने शिक्षण पूर्ण केले.
डॉक्टर प्रविणचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण गावानजीकच असलेल्या मनब्दा येथील श्रीनाथ माध्यमिक विद्यालयात, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण तेल्हारा तालुक्यातीलच तळेगाव बाजार येथील राजीव गांधी महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथे पूर्ण झाले.पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्णही झाला. त्याने शेतकरी आई-वडिलांचे स्वप्न साकार करून व गावातील पहिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.