⁠
Inspirational

शेतकऱ्याच्या मुलाने करून दाखवले ; सागरचे तिहेरी यश !

सागर राक्षेचे आईवडील शेतकरी आहेत. सागरने जिद्द व चिकाटीने अभ्यास करून आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले. शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि वाढलेल्या सागरचा ध्यास हा नक्कीच कौतुकास्पद आहे. खेड तालुक्यातील राजगुरुनगर – बहिरवाडी या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात सागरची जडणघडण झाली.त्याचे शालेय शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. नंतरचे दहावीपर्यंतचे शिक्षण राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात, तर बारावीपर्यंतचे शिक्षण हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात झाले. पुढे लोणावळा येथील सिंहगड महाविद्यालयातून त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली.

आता पुढे काय? हा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला‌. त्यामुळे त्याने स्पर्धा परीक्षेची वाट पकडली. त्याने सारथीची परीक्षा देऊन छात्रवृत्ती मिळविली, त्यामुळे खर्चाचा भार हलका झाला. स्पर्धा परीक्षांबद्दल अधिक माहिती आणि पूर्वतयारी करावी म्हणून ठाण्याला युनिक अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो राजगुरुनगरला परतला. त्यानंतर येथील स्वर्गीय बाळासाहेब आपटे अभ्यासिकेत सहा वर्षे सातत्यपूर्ण अभ्यास केला. प्रवासात अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागले.

पण त्याच्या कष्टाला फळ मिळाले.‌प्रथम नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. त्यानंतर दिलेल्या एमपीएससी परीक्षेत तो राज्य विक्रीकर निरीक्षक पदासाठी पात्र ठरला. याच परीक्षेची एक महिन्यानंतर सुधारित गुणवत्ता यादी जाहीर झाली, त्या यादीत तो सहाय्यक कक्ष अधिकारी (मंत्रालय) या पदासाठी पात्र ठरला. अशा प्रकारे २०२४ या वर्षात त्याने एमपीएससी परीक्षेमधून तीन पटांना गवसणी घातली.‌

Related Articles

Back to top button