आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार झाले.कर्जत तालुक्यातील चांधई गावातील तरुण संजू सुदाम कोळंबे यांनी जिद्दीने मुंबई मोनोरेलमध्ये नोकरी मिळविली आहे.संजूची आई अंगणवाडी सेविका आणि वडील भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात. अशा तुटपुंज्या आर्थिक कमाईवर मोठ्या पदावर नोकरी मिळवायची अशी जिद्दी संजू कोळंबे याने कायम ठेवली होती.
त्याचे प्राथमिक शिक्षण घेऊन कडाव येथील श्री गजानन माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतलेल्या संजूने पुढे आपल्या गावाच्या हद्दीत असलेल्या तासगावकर संस्थेत पॉलिटेक्निक पदविका शिक्षण घेतले. इथवर तो थांबला नाही, तर कर्जत येथील कोकण ज्ञानपीठमध्ये मेकॅनिकल इंजिनीयरची पदवी पूर्ण केली. या प्रवासात त्याला त्याच्या आई आणि वडिलांनी खूप पाठिंबा दिला.
घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याने अभियांत्रिकी मधील चांगल्या गुणांच्या जोरावर मारुती सुझुकी कंपनीमध्ये सर्व्हिस इंजिनिअर पदावर नोकरी सुरू केली. तेथे पाच वर्षे काम करीत असताना चांगला अनुभव गाठीशी मिळाल्याने स्पर्धा परीक्षा मध्ये धावपळ करीत असताना मुंबई मोनोरेलमध्ये कर्नलपदासाठी जाहिराती निघाल्या. त्यासाठी त्याने देखील अहोरात्र मेहनत घेतली. त्याला परिस्थितीची जाणीव होती आणि कष्टाचे चीज करणं हे उराशी जिद्द होती.
तेथे मुलाखतीमध्ये अनेकांना मागे सारत पहिला क्रमांक पटकावला. संजू कोळंबे या तरुणाने आईवडिलांची मेहनत सफल करून दाखवली आहे.