प्रयत्न केला तर कधी ना कधी यश मिळतेच; मेंढपाळ कुटुंबातील लेकाची ही यशस्वी कहाणी..
आपल्याला जसे यश पचवता आले पाहिजे तसेच अपयश देखील पचवता आले पाहिजे. हेच मेंढपाळ कुटुंबातील विठ्ठल किसन कोळेकर या युवकाचे करून दाखवले आहे. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची…दोन एकर जिराईत शेती अपुरी असल्याने विजया शेती करतात आणि किसन हे बिगारीकाम, गवंडीकाम करून संसाराची जबाबदारी पेलत आहेत.
किसन व विजया कोळेकर या दांपत्याला तीन मुली आणि विठ्ठल हा एकटा मुलगा आहे.विठ्ठलचेही प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पळशी येथे आणि माध्यमिक शिक्षण अनंतराव पवार विद्यालयात पूर्ण झाले. लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. पण परिस्थिती झगडत अभ्यास करावा लागला. त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागल्यावर अनेकदा अपयश आले. पण त्याने सातत्य ठेवले.
कोरोनानंतर कोणतीही सुट्टी न घेता सातत्यपूर्ण अभ्यास केला. सण- समारंभ, उत्सव, जत्रा, मोबाईल अशा गोष्टींमध्ये वेळ घालवला नाही. त्याला पाच वर्षांत सात वेळा अपयश आले, परंतु अलीकडच्या आठ महिन्यांत तब्बल सात स्पर्धा परीक्षांमध्ये सलग यश मिळवत त्याने आपल्या यशाला सप्तरंगी साज चढविला आहे.केवळ आपल्या आई-वडिलांनी वेळोवेळी पुरविलेले बळ आणि काहीतरी करून दाखविण्याच्या जिद्दीच्या जोरावर आज विठ्ठल सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता झाला आहे.