खरंतर आयुष्य हा एक मोठा प्रवास आहे. यात कधी यश येते तर कधी अपयश येते. रोशनी दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलीस भरतीला गेली आणि अवघ्या १४ मार्काने नापास झाली. पण तिने परत मैदानी सराव व अभ्यास करून २१व्या वर्षी शासकीय पोलीस दरात भरती झाली. रोशनी आकाश तायडे ही फैजपूरजवळ असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखाना वसाहतीतील रहिवासी.
तिचे वडील आकाश वामन तायडे, वय ४२ याचा व्यवसाय चहाची टपरी आणि आई संगीता आकाश तायडे, वय ४० या शेतमजुरी करतात. मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने टपरीचा व्यवसाय फारसा सुरू नव्हता. जेमतेम घरचा खर्च भागेल हाच त्यांचा उद्देश. आई दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करून घरात हातभार लावायची.यांची ही एकुलती एक मुलगी २०२० मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर बीएससी या प्रथम वर्षाला तिने प्रवेश घेतला. मात्र मनामध्ये जिद्द दुसरीच होती. २०२२ ला तिने पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली.
त्यावेळी मुंबई येथे पोलीस भरतीसाठी जागा निघाल्या होत्या. मुंबईत तिचा पहिलाच पेपर होता. त्यावेळी १४ मार्काने रोशनी नापास झाली.नापास झाल्याने रोशनी पूर्ण खचून गेली होती.१४ मार्काने नापास झाली होती, तरी वडील बाहेर सांगताना माझी मुलगी फक्त २ मार्कांनी नापास झाली आहे असं सांगायचे. आई-वडिलांनी दिलेली साथ ही तिच्यासाठी अनमोल ठरली.तिने सप्टेंबर २०२३ पासून पुन्हा पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली. लहान भाऊ केतन तायडे आणि काका संदीप कोळी यांचे मार्गदर्शन मिळाले.
घरामध्ये लेकीला कुठलंही काम तिची आई करू देत नव्हती. घरातली कामं करुन तिची आई दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरीसाठी जायची. सकाळी पाच वाजता लहान भाऊ हा रोशनीला मैदानावर सोडण्याचं काम करायचा. घरच्यांचा पाठिंबा आणि जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जळगाव पोलीस भरतीत मुलींमधून चौथ्या क्रमांकावर बाजी मारत झाली आहे.