12वीत असताना लग्न झाले ; वडील मजूर कामगार पण लेक मेहनतीच्या जोरावर बनली सहाय्यक कर आयुक्त!
आपल्याला शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम वातावरण नसेल तरी जिद्दीच्या जोरावर गगनभरारी घेता येते. हे पुनीता कुमारी यांनी दाखवून दिले आहे.बिहार राज्यातील सुपौल जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पुनीता कुमारी यांनी बालपणापासून अत्यंत हालाखीचे जीवन काढले. परंतू , पुनिता या अगदी लहानपणापासून अभ्यासामध्ये अतिशय हुशार असल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिकण्यासाठी खूप मोठे प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला.
त्यांचे वडील मजूर म्हणून काम करायचे व त्यांना पाच बहिणी होत्या. एवढे मोठे कुटूंब पण कमवता एकटाच माणूस होता. ते पण वडील मजुरीवर घरचा खर्च भागवायचे. त्यामुळे पुनीता यांनी शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची निवड केली. कितीही अडथळे आले तरी देखील शिक्षण पूर्ण करायचे व त्यांनी ते बारावी पर्यंत पूर्ण केले. पण त्यांचे बारावीनंतर लग्न झाले. इतक्या कमी वयात शिक्षण सोडून संसाराची जबाबदारी अंगावर पडली.
काही वर्षांनी त्यांच्या पतीची देखील नोकरी गेली व आर्थिक परिस्थिती आणखीनच खालावली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्या दोन मुलांच्या आई झाल्या. हे सगळे सुरू असताना मात्र २००४ला नशिबाने त्यांच्या पतीला पुन्हा नोकरी लागली. परंतु तरीदेखील यातून खर्च भागत नव्हता व आर्थिक अडचणी थांबत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आता स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे ठरवले. त्या फक्त शिक्षणातचं हुशार नव्हत्या तर खेळामध्ये देखील अव्वल होत्या. त्यामुळे धाडसीपणा हा मूळात गुण होताच. स्पर्धा परीक्षा द्यायची तर पदवी शिक्षण हवे म्हणून त्यांनी लग्नानंतर तब्बल तेरा वर्षानंतर पदवी पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला.
शिक्षण करत असताना घरी आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी एका शाळेमध्ये नोकरी देखील केली. संसार सांभाळणे व अभ्यासाची तयारी अशा बिकट वाटेवर त्यांचा प्रवास सुरू होता. पदवी शिक्षण उशीरा पूर्ण झाल्याने त्यांनी भरती होण्यासाठी अनेक पर्याय शोधायला सुरुवात केली व या माध्यमातून बिहार पब्लिक सर्विस कमिशन अर्थात बीपीएससीची तयारी केली. त्या ती परीक्षा तर उत्तीर्ण झाल्याच पण परीक्षा पास होण्याअगोदर त्यांनी उच्च न्यायालयात पॅरा ज्युडीशियरी परीक्षा देखील उत्तीर्ण केली होती व उच्च न्यायालयामध्ये त्यांनी या पदावर काम केले.
अखेर २०१८ मध्ये पुनिता कुमारी यांनी बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली व आज त्या बिहारमध्ये सहाय्यक कर आयुक्त या पदावर नियुक्त आहेत.