Success Story आपल्याला मेहनत करायची हिंमत असेल तर यश देखील मिळवता येतेच. तसेच धुळे जिल्ह्यातील फागणे गावातील राहूल सुर्यवंशी या युवकाचे चार महिन्यांत हे तिसरे सिलेक्शन आहे. पहिले सिलेक्शन बीएमसी (मुंबई) येथे, दुसरे सिलेक्शन मुंबई पोलिस, तिसरे सिलेक्शन सहाय्यक अभियंता (क्लास-२)पदी झाले.
राहूल साधारण दोन वर्षांचा असतानाच त्याचे वडील वारले. कालांतराने तो १४ वर्षांचा असताना आईनेही जग सोडले.मोठी बहीण अश्विनी, भाऊ रूपेश व तो अशा तीनच व्यक्ती कुटुंबात राहिल्या. तिन्ही भावंडे पोरकी झाली. त्यामुळे आता खायचे काय? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? हे प्रश्न त्यांच्या समोर होते. त्यासाठी त्यांनी घरोघरी वृत्तपत्र वाटली…वेळप्रसंगी भाजीपाला देखील विकला. तर रूपेश या त्याच्या भावाने रोजंदारीने कापसाच्या गाड्यांवर मोलमजूरी केली. पण या पोरांनी शिक्षणाची कास काही सोडली नाही.
राहूलचे शालेय शिक्षण हे गावातीलच सी. एस. बाफना हायस्कूलमध्ये झाले. त्याला दहावीमध्ये देखील चांगले गुण मिळाले. तसेच त्याने पुढे धुळे येथे गव्हर्न्मेंट डिम्लोमा करून जळगाव येथे इंजिनिअरिंग पूर्ण केले. खासगी कंपनीत जॉब करून एम.टेक.पर्यंत शिक्षण घेतले. या सोबतच त्याने स्पर्धा परीक्षेचा देखील अभ्यास केला.त्यात देखील सातत्याने अभ्यास केला. कष्टाचे जाणीव ठेवून दिवसरात्र अभ्यास केला. तेच उद्दिष्ट मनात ठेवले तर अशक्य गोष्ट ही शक्य होत असते आणि सिद्ध केले. याच मेहनतीच्या जोरावर त्याने तब्बल एक नाही, दोन नाही तर त्याचे तिसरे सिलेक्शन क्लास टू पदी होऊन खडतर परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घातली.