Success Story : लहानपणापासून धनगर कुटूंबातील जडणघडण. अत्यंत गरिबीची परिस्थिती… घरातला पहिलाच युवक शाळा शिकला अन् मेंढ्या वळूनसन फौजदार झाला. ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची आहे. राजेंद्र कोळेकर या मेंढपाळाच्या मुलांची गोष्ट कित्येक युवकांना नव्याने भरारी घेण्यासाठीची ताकद देते.
शेती नाही. त्यामुळे मेंढ्यांच्या पालनपोषणावरच कोळेकर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होता. राजेंद्र भीमाजी कोळेकर हा अहमदनगर जिल्ह्यातील ढवळपुरीचा रहिवासी. पारनेर तालुक्यातलं हे एक छोटसं गाव आहे.
घरातून शाळेत जाणारा, पदवीपर्यंत शिक्षण घेणारा राजेंद्र हा पहिलाच मुलगा. त्याचे शालेय शिक्षण गावाच्या शाळेत झाले तर पुढे शिकून मोठे व्हावे म्हणून कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्याने कला शाखेतून राज्यशास्त्राचे पदवीपर्यंतच शिक्षण घेतली. पण त्यातही मेंढ्या वळणं सुटलेले नाही. मेंढपाळ तर करायचा पण शेतीकाम देखील करायचा. दिवसभर कष्टाचेच काम असल्याने शरीर काटक होतेच.
यांचा फायदा त्याला मैदानावरच्या चाचणीत झाला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याला स्पर्धा परीक्षेची माहिती समजली. त्यानंतर त्याने तयारीला सुरुवात केली. दररोजचा अभ्यास व लेखन सराव यामुळे २०१९ मध्ये पहिल्याच परीक्षेमध्ये राजेंद्र याने यशाला गवसणी घातली आणि फौजदार झाला.
नाशिकला अकादमीमध्ये प्रशिक्षणाला येईपर्यंत राजेंद्र ढवळपुरीत मेंढ्या वळत होता.त्याच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्रचा चुलत भाऊ गोविंद नाथा कोळेकर हा देखील सध्या महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये १२३ व्या तुकडीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.