आपल्याला स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करण्याची आपोआप तयारी होते.
तसाच संघर्ष रविंद्रने केला आणि त्याचे स्वप्न पूर्ण झाले. लहानपणीच आई – वडीलाचे छत्र हरपले. त्यामुळेच वृद्ध आजी आजोबासह घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर पडली.रविंद्र सुतार हा धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली – कुंभारवाडी गावचा लेक.
त्याने गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे आर्थिक परिस्थितीशी सामना करत बारावीपर्यंत शिक्षण घेतले. रवींद्रने गावातील इतर तरुणांच्या बरोबर कधी बांधकामावर तर कधी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्यात कामे केली.पण पोलीस बनण्याची जिद्द मात्र सोडली नाही.
रविंद्र मैदानी सरावासाठी दररोज पहाटेच्या वेळी लवकर उठून भरतीचा सराव करायचा. या आधी त्याने पोलीस दल भरतीसाठी त्याने अनेक वेळा प्रयत्न केले. पण दरवेळी काही गुणांमुळे त्याला अपयश येत होते. पण या अपयशाला खचून न जाता सातत्य व योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर खाकी वर्दीचे स्वप्न बाळगले. अभ्यास तर केलाच पण त्याच बरोबर मैदानी सराव देखील केला. त्यामुळे मेहनत व जिद्दीच्या जोरावर संधीचे सोने केले. घरात अठरा विश्व दारिद्र्य पाचवीला असताना देखील तो मेहनतीने शिकला, धडपडला पण हरला मात्र नाही. यामुळेच त्याची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून नुकतीच पोलीस प्रशिक्षणासाठी रवानगी झाली आहे.