ग्रामीण भागात राहून शिक्षण घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. कारण, तिकडे जवळपास शाळा – महाविद्यालय देखील नसतात तसेच विविध सोयीसुविधांचा अभाव असतो. रोहिणीला देखील महाविद्यालयात जाण्यासाठी ५० किमीचा प्रवास दररोज करावा लागायचा. त्यात शेतकरी कुटुंब असल्याने वेळोवेळी आईवडिलांना शेतीकामात मदत करावी लागायची. त्यामुळे अभ्यासाला कमी वेळ मिळायचा. पण तिने जिद्द ठेवली होती.
रोहिणीचे प्राथमिक शिक्षण विसापूर येथे तर माध्यमिक शिक्षण कातरणी येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात झाले. तिने धानोरा येथील मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या प्रथितयश संस्थेत प्रवेश मिळाला. ग्रामीण भागात राहत असल्याने क्लासची सोय नाही. तशी आर्थिक परिस्थितीही नाही. त्यात कोरोनामुळे महाविद्यालय बंद असल्यामुळे होईल तेवढा घरीच अभ्यास करून तालुक्यातील विसापूर येथील रोहिणी विलास ढोमसे या विद्यार्थ्यांनीने डी. फार्मसीच्या परीक्षेत ९५.६० टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थीही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे.
अत्यंत गरीब परिस्थितीतुन कुठेही क्लास न लावता स्वत:च्या मेहनतीने व जिद्दीने अभ्यास करत तिने हे यश संपादन केले. परिस्थिती कशीही असली अन् मनात काही करण्याची जिद्द असेल तर यशाला गवसणी घालता येतेच हे दाखवून दिले आहे