काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होतो. तो असा की बुलंदशहर शहरातील एका राजकीय नेत्याने हेल्मेट न घातल्याने पोलिस अधिकारी यांनी कारवाई केली होती. त्यानंतर त्यांची तडका फडकी बदली करण्यात आली. त्या पोलिस अधिकारी म्हणजे उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील श्रेष्ठा ठाकूर. त्यांची लेडी सिंघम म्हणून निराळी ओळख आहे. श्रेष्ठा यांचे वडील एस. बी. सिंह भदौरिया हे प्रसिध्द व्यापारी आहेत. श्रेष्ठा यांना दोन मोठे भाऊ आहेत. त्यांना त्यांच्या या शैक्षणिक व सरकारी कामात मोठ्या भावाचा खूप पाठिंबा आहे.
मोठा भाऊ मनीष प्रताप हे त्यांना पदोपदी मदत करत आले आहेत. हा स्पर्धा परीक्षेचा प्रवास अनुभवत असताना त्यांना अनेकदा अपयश आले. पण भावाने पाठिंबा दिला. याच प्रेरणेतून प्रत्येक मुलीने शिकले पाहिजे आणि महिलांना सुरक्षितता लाभली पाहिजे. यासाठी त्या कायम धडपडत असतात. श्रेष्ठा यांनी कानपूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अभ्यासाच्या दिवसात रस्त्यावरील विक्रेत्यांकडून त्यांचा दोनवेळा विनयभंग झाला. त्यांनी पोलिसात तक्रार केली असता योग्य कारवाई झाली नाही. या घटनेने श्रेष्ठा ठाकूर यांच्या मनात पोलीस अधिकारी होण्याची इच्छा निर्माण झाली. मग त्यांचा खरा प्रवास सुरू झाला.
श्रेष्ठा यांनी मेहनतीने आपले स्वप्न पूर्ण केले. २०१२ मध्ये त्या यूपी पीसीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या पोलीस दलात रुजू झाल्यानंतर, पोलीस अधिकारी होईन आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांवर कडक कारवाई करेन; असा त्यांना ठाम विश्वास होता. श्रेष्ठा ठाकूर या महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देतात. मुलींना शारीरिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी त्या तायक्वांदोचे प्रशिक्षणही देतात. त्या ज्या जिल्ह्यात तैनात आहेत त्या जिल्ह्यातील गुन्हेगारांना त्यांची भीती वाटते.