Success Story : खरंतर सध्याच्या काळात मुली सगळ्याच क्षेत्रात बाजी मारत आहेत. पण जेव्हा गावातली मुलगी जिद्दीने एक पाऊल पुढे टाकते तेव्हा साऱ्या गावाला याचा अभिमान वाटतो. असेच एक धाडसी पाऊल योगिता आण्णा देवरे हिने टाकले आहे. ती भारतीय नौदलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन देशसेवेत दाखल झाली आहे.
योगिता ही मूळची तळवाडे (ता.मालेगाव) येथील रहिवासी आहे. तिचे वडील अनेक वर्षांपासून मुलांच्या शिक्षणासाठी येथे सोयगावला वास्तव्यास आहेत. योगिता हिच्या रूपाने जिल्ह्यातील पहिली अग्नीवीर होत भारतीय नौदलात मालेगाव तालुक्याचा झेंडा रोवला त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.वडील आण्णा दामू देवरे हे निवृत्त जवान आहेत तर आई मंगल गृहिणी असून शेतीकामात कुटुंबियांना मदत करतात.
लहानपणापासून अभ्यासात हुशार होती.दहावीत ८८टक्के तर बारावीत ७७ टक्के मिळवून उत्तीर्ण झालेल्या योगिताने बारावीनंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला. देशसेवेची ओढ असल्याने आपण वेगळं काही तरी करू शकतो या भावनेने मुंबईत अग्निवीर परीक्षा दिली. त्यात तिला यश आले.
सोयगाव भागातील कॉम्प्युटर इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून योगिता आण्णा देवरे हीने भारतीय नौदलाची परिक्षा उत्तीर्ण होऊन देशसेवेत दाखल झाली. सैन्यात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अग्निवीरांच्या भरतीमध्ये मुलींनाही संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सैन्य दलासारख्या अवघड अशा सेवेत महिलांनी जाणं याबाबत असलेल्या अज्ञानपणास फाटा देऊन योगिताने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून जिल्ह्यातील पहिली महिला अग्निवीर ठरली आहे.ओरिसा राज्यातील आयएनएस चिल्खा सेंटर येथे प्रशिक्षणासाठी रुजू झाली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिला अग्निवीर म्हणून देश रक्षणासाठी सज्ज होणार आहे.योगिताने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सैनिक सेवेत यश संपादन करून मुलीही कुठेच मागे नाहीत हे सिद्ध करून दाखविले आहे.