शेतकऱ्याच्या मुलीची जलसंपदा विभागात निवड; वाचा प्रणाली पाटीलची यशोगाथा
Success Story : किनवट येथील घोटी गावातील एक शेतकऱ्याची मुलगी प्रणाली चंद्रमणी पाटील तिच्या कष्टाच्या जोरावर महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात प्रयोगशाळा सहायक पदावर निवडून आली आहे. ही निवड तिच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे जो तिच्या शैक्षणिक प्रवास आणि निरंतर प्रयत्नांचा परिणाम आहे.
प्रणालीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दत्तनगर घोटी येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक शाळा, किनवट येथे पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा जोतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे पूर्ण करून, तिने वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला आणि बी.टेक आणि एम.टेक या पदव्या मिळवल्या.
प्रणालीचे वडील शेतकरी असून, शेतीत दरवर्षी तोटा होत असल्याने ते निरंतर दुःखी असायचे. या दुःखाचे कारण समजून घेऊन, प्रणालीने शेतकऱ्यांच्या समस्यांवर शोध सुरू ठेवला आणि स्पर्धा परीक्षेतून जलसंपदा विभागात प्रयोगशाळा सहायक पदावर निवडून येण्याची यशस्वी प्रगती केली. हे पद मिळाल्यानंतर, ती शेतकऱ्यांची सेवा करून त्यांचे दुःख दूर करण्याचा निश्चय केला आहे.
प्रणालीच्या यशाबद्दल मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा प्राचार्या शुभागी ठमके, विजय पाटील, प्राथमिक शिक्षण व स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शालेय पोषण आहार अधिक्षक अनिलकुमार महामुनेदीपक महामुने (मामा), गौतम महामुने, किशनराव ठमके, शेषेराव लढे मुख्याध्यापक अंबादास जुनगरे, पर्यवेक्षक किशोर डांगे यांचेसह महात्मा फुले विद्यालय गोकुंदा, घोटी व सुभाषनगरचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या मातोश्री व महात्मा जोतिबा फुले विद्यालयातील शिक्षिका संगीता महामुने-पाटील यांचे तिला पाठबळ आणि मार्गदर्शन लाभले.