घरची परिस्थिती बेताची…अवघी दोन एकर शेती मात्र दुष्काळजन्य भाग…त्यात सारं कुटुंब हे शेतीवरच अवलंबून…तरी देखील अभिजित गरूड याने निश्चिय केला होता. आपण एक ना एक दिवस अधिकारी होणार आणि परिस्थिती बदलणार. निफाड तालुक्यातील ओझर या लहानशा गावात त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.
त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे ठरवले. पण पैसे मात्र नव्हते. आई – वडील मजूरी करायचे. तर हा देखील द्राक्ष बागायतदार संघात केमिस्ट म्हणून नोकरी करायचा. पण नोकरी करत अभ्यास होत नसल्याने त्याने नोकरी देखील सोडली. तेव्हा मित्रांनी साथ दिली.
वेळोवेळी आर्थिक व मानसिक आधार दिला. त्यामुळेच, त्याने अभ्यासाकडे अधिक लक्ष केंद्रित केले. याच दरम्यान त्याने तलाठीसाठी अर्ज केला. या निकालात त्याला २०० पैकी १९५ गुण मिळाले. तो निकाल आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्याने तलाठी पदाला गवसणी घातली.