⁠  ⁠

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत देखील जिद्दीने लक्ष्मण झाला तलाठी !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Success Story : आपल्याला मनासारखी नोकरी मिळवायची असेल तर संघर्ष हा करावाच लागतो. असाच लक्ष्मणने देखील संघर्ष केला…आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यासात जिद्द ठेवली. लक्ष्मण महाजन हा मूळचा पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा या भागातील लेक. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची…वडील शेतकरी तर आई गृहिणी असल्याने संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून होते. ते संपूर्ण कुटुंब याच भागात भाड्याच्या घरात राहतात‌.

पण आपल्या मुलाने उच्च शिक्षित व्हावे ही घरच्यांची अपेक्षा होती. त्यामुळे त्याने शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा मार्ग निवडला. लक्ष्मणचे मामा धुळे जिल्ह्यात सध्या मंडल अधिकारी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. लक्ष्मण हा आतापर्यंत राज्यसेवेच्या वर्ग -दोन आणि वर्ग -तीन च्या अनेक मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरला होता. दरम्यान, त्याची आता सरळसेवेच्या माध्यमातून तलाठी पदासाठी निवड झाली आहे.लक्ष्मणने नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार शिक्षण संस्थेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.

तसेच त्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून २०२१ साली अर्थशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या तो वकिली शिक्षणाच्या व्दितीय वर्षाला आहे‌. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने घरीच अभ्यास केला. घरची परिस्थिती बदलण्याची हा निकाल महत्त्वाचा होता. म्हणूनच, त्याने मेहनत घेतली. याच मेहनतीला यश आले. १९३.६२ गुणांसह तलाठी पदाला गवसणी घातली. लक्ष्मणने धुळे जिल्ह्यासाठी इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (सर्वसामान्य) पहिली रैंक प्राप्त केली. अवघ्या २४व्या वर्षी मिळवलेलं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.

Share This Article