मुंबई :- तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत १८०९ पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार असून, तलाठ्यांच्या प्रवास भत्त्यात वाढ करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. सात-बारा संगणकीकरण मोहिमेत राज्यातील तलाठ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे, तलाठ्यांना प्रोत्साहन म्हणून किमान एक वेतनवाढ मिळावी, अशी मागणी महासंघाच्या वतीने यावेळी करण्यात आली. त्यावर, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
तलाठी कार्यालये भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. अशा कार्यालयांना भाडे रक्कम देण्यासंदर्भात महसूल विभागाने प्रक्रिया सुरू केली असून, नागपूर विभागासाठी २ कोटी व अमरावती विभागासाठी ५ कोटी १३ लाख रुपयांच्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. ऊर्वरित विभागासाठी लवकरच तरतूद करण्यात येणार आहे.
राज्यातील ८० टक्के तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले असून, उर्वरित तलाठ्यांनाही लवकरच लॅपटॉपचे वितरण करण्यात येतील. मंडल अधिकारी, अव्वल कारकून यांची पदे अदलाबदलीने भरण्यासंदर्भातील शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात येईल. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी धोरण तयार करण्यात येईल व त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.