हल्ली तरूणमंडळी वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. इतकेच नाहीतर हे तरुण परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतू असे असूनही त्यांना निराशेचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत एकाच प्रयत्नात चार पदांवर प्रथम क्रमांकाने नताशाने यश संपादन केले आहे.
तिची ही एक प्रेरणादायी गोष्ट…मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील रहिवासी २१ वर्षीय नताशा लोधीची. मध्य प्रदेश कर्मचारी निवड मंडळाने विविध पदांसाठी गट- २ आणि उप गट-३ परीक्षेचे निकाल जाहीर केले.ज्यामध्ये कोलारस, शिवपुरी येथील नताशा लोधी हिने एकाच वेळी चार पदांवर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नताशा लोधी ही शिवपुरीच्या वॉर्ड-१ जगतपूर कोलारस येथील रहिवासी माजी नगरसेवक रामकुमारी नरेंद्र सिंह लोधी यांची मुलगी आणि ऑल इंडिया लोधी ऑफिसर्स-एम्प्लॉईज असोसिएशनचे ब्लॉक अध्यक्ष सुरेंद्र सिंह लोधी (शिक्षक) यांची भाची आहे. नताशाने नवोदय विद्यालय, पनघाटा (नरवार) येथून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. २०२२ मध्ये होळकर कॉलेज इंदूरमधून बीएससी उत्तीर्ण झाले.नताशा लोधीच्या वयाबद्दल बोलायचे झाले तर ती फक्त २१ वर्षांची आहे. फेब्रुवारी महिन्यात नताशाने चार स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. या चौघांमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला हे आश्चर्यकारक आहे.
इतकेच नाही तर तिने केवळ ३ महिन्यांच्या तयारीत चार परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. नताशाने मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळात वरिष्ठ, अधिकारी, मध्य प्रदेशातील मत्स्य निरीक्षक, इंदूर दूध संघातील वरिष्ठ तंत्रज्ञ, आयुक्त अन्न सुरक्षा आणि नियंत्रक (अन्न आणि औषध प्रशासन, मध्य प्रदेश) मध्ये औषध विश्लेषक अशा चार पदांसाठी निवड यादीत तिचे नाव आले असून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
व्यवसायाने शिक्षक असलेल्या काकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षांची तयारी केली. मात्र, नताशाचे उद्दिष्ट हे वरिष्ठ प्रशासकीय सेवेत जाण्याचे आहे. आता ती यूपीएससीची तयारी करणार आहे.