⁠
Inspirational

जिल्हा परिषद शाळेतील पोराने केली कमाल; संशोधनाच्या जोरावर जगातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये पटकावले स्थान !

संशोधन म्हटलं की सातत्याने अभ्यास, नाविण्यपूर्णता आणि चिकाटी या सर्वांतून यवतमाळच्या तरूणांचा जगातल्या दहा सर्वोत्तम संशोधकांमध्ये समावेश झाला आहे.डाॅ. विवेक पोलशेट्टीवार ह्या तरूणाचे बालपण व जडणघडण झरी तालुक्यातील मांगली नावाच्या छोट्याशा खेड्यातून झाले. मांगलीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकून ध्येयवेड्या विवेकने जगाला नवे संशोधन दिले आहे.त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच जिल्हा परिषद शाळेत घेतल्यानंतर वणीत बीएसस्सी आणि अमरावतीमध्ये एमएसस्सी केले.

ग्वाल्हेरमध्ये पीएचडी केली. त्यानंतर फ्रान्स, अमेरिकेत सखोल संशोधनाचे काम केल्यावर परदेशी नोकरीच्या अनेक संधी खुणावत असताना त्यांनी देशातच सेवा देण्याचा निश्चय केला. मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये ग्रीन केमेस्ट्री या क्षेत्रात मुलभूत संशोधनावर काम करीत संशोधनाची कास धरली.

संशोधनात नॅनो टेक्नॉलॉजी वापरून विवेक पोलशेट्टीवार यांनी सोन्याच्या नॅनो कणांमधील आकार आणि अंतर बदलून पिवळ्या सोन्याचे काळ्या सोन्यात रूपांतर केले. एखादे झाड ज्याप्रमाणे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेते, त्याचप्रमाणे हे काळे सोनेही कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. या काळ्या सोन्याच्या आधारे कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि पाण्यातील हायड्रोजन एकत्र साठवून त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यातून मिथेनसारखे इंधन तयार केले गेले.

प्रदूषण टाळणारे इंधन उत्पादित करणारे कृत्रिम झाड म्हणून या ब्लॅक गोल्डचा पुढील काळात वापर होणार आहे. पोलशेट्टीवार आता या तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.कार्बन डायऑक्साइडचे संग्रहण आणि पाण्यातील ऑक्सीजनपासून हायड्रोजन वेगळा करणे तसे बरेच कठीण काम होते. पण त्यांनी यशस्वी करून दाखवले.

म्हणूनच, या तरुण शास्त्रज्ञाचा समावेश आता जगातल्या दहा सर्वोत्तम संशोधकांमध्ये झाला आहे. जर्मनीतील ‘फॉलिंग वॉल्स’ या अत्यंत प्रतिष्ठित वैज्ञानिकांच्या सोसायटीतर्फे दरवर्षी जगभरातील तरुण संशोधकांतून उत्कृष्ट शास्त्रज्ञांची निवड केली जाते. त्यात यंदा हजार शास्त्रज्ञांमधून डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांच्यासह अन्य नऊ शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. त्यांना नोव्हेंबरमध्ये बर्लीन येथे ‘फॉलिंग वॉल्स’ पुरस्काराने हार्वर्ड, येल, आयबीएम, ईटीएच, एमआयटी आणि मॅक्स प्लँक येथील नामांकित शास्त्रज्ञांसह सन्मानित केले जाणार आहे.

Related Articles

Back to top button