जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या शेतकरी पुत्र झाला शास्त्रज्ञ !
Success Story आपण मोठे स्वप्न बघितले की ते पूर्ण करण्याची जिद्द व चिकाटी मिळत राहते. तसेच तुषारला देखील शिक्षणाची ओढ शांत बसू देत नव्हती. त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नोकरी करत त्याने अभ्यासाला सुरुवात केली. डीआरडीओची जाहिरातीनुसार त्याने अर्ज दाखल केला. देशातील दीड लाखापेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धेत असताना तुषार रौंदळने यश मिळवून सैन्यदलात शास्त्रज्ञ बनला. वाचा त्याच्या यशाची ही कहाणी…
तुषारची जडणघडण शेतकरी कुटुंबात झाली. तो लहानपणापासून शेतकरी कुटुंबात वाढला. वडील गणपत व आई संगीता दोन एकर शेतीत उपजीविका भागवितात. त्यांचा दुसरा मुलगा रोहित इलेक्ट्रिक व्यवसाय करतो. तुषारचे शालेय शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत झाले. चांदोरीतच ‘रयत’च्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यानंतर क. का. वाघ तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल पदविका पूर्ण केली. मेकॅनिकल पदवी ‘मविप्र’च्या अभियांत्रिकी विद्यालयात घेतल्यावर त्याने महानिर्मितीमध्ये नोकरीही मिळविली. पण त्याला स्पर्धा परीक्षेत गोडी होती. म्हणून त्याने त्यासाठी जिद्दीने अभ्यास सुरू केला.इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यातच विज्ञानाची आवड असल्याने अभ्यास करीत होता. सैन्यदलातील या संधीला आत्मविश्वासाने समोर गेला.
देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी घेतलेल्या मुलाखतीत उत्तीर्ण झाला.डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात ‘डीआरडीओ’मध्ये येथी तुषार रौंदळ याची निवड झाली आहे. घरातील पहिला उच्च शिक्षण घेणारा तरुण म्हणून सगळेच कुटुंबीय त्याला शिक्षणाला प्रोत्साहन देत होते.आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या त्याच्या वडिलांना शिकायचे होते, पण परिस्थितीने शिकता आले नाही.
आता मात्र तुषारच्या रुपाने त्यांना आपणच भारतीय सैन्यात दाखल झाल्याचा आनंद झाला आहे.एखाद्या विषयाची डिग्री घेतल्यानंतर त्यातच पुढे शिक्षण घेणे चांगले असताना, अनेक तरुण नोकरीमागे धावतात. मूळ ज्या विषयात शिक्षण घेतले त्यातच तुम्ही अभ्यास करीत राहिल्यास अनेक चांगल्या संधी उपलब्ध असल्याचे तुषारने दाखवून दिले आहे.