वडील रंगकाम करतात पण शामलने संकटांशी सामना करत मिळवले IAS हे पद!
UPSC IAS Success Story : आपली जिद्द आणि स्वप्न निश्चित असतील तर यश हमखास मिळते.शामलच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताची होती. वडील रंगकाम व शेती करतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहे. मध्यंतरी आईचं कर्करोगानं निधन झालं. ज्या आईने आपली मुलगी कलेक्टर व्हावी असं स्वप्न पाहिलं होतं, तीच आता अशी अर्ध्या वाटेवर सोडून गेल्याने शामलच्या डोळ्यापुढे काळोख निर्माण झाला. असे असूनही शामने प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.
आईच्या आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत घेतली…नुसते स्वप्न बाळगले नाहीतर तर त्या स्वप्नांसाठी मेहनत देखील घेतली.आपण ठरवलं तर काहीही करू शकतो, कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो आणि आपलं नशिब बदलू शकतो ह्याचे शामल भगत हे उत्तम उदाहरण…..शामल ही मूळची पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या काठी वसलेल्या भगतवाडी या गावची लेक.लहानपणापासूनच हुशार असलेली शामलने दहावीत शाळेत पहिला क्रमांक पटकावला.तिच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं.
बारावीपर्यंतचं शिक्षण सराटी गावातील जिजामाता विद्यालय येथे झालं. तिथेही तिने पहिला नंबर सोडला नाही. पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयातून तिने बीएससी कृषी क्षेत्रात पदवी पूर्ण केली. त्यावेळी तिने विद्यापीठातून सुवर्ण पदकही पटकावलं होतं.गावात जडणघडण झाल्याने तिला कमी वयात लग्नासाठी विचारले जात असे….शामलने लग्नाला विरोध करत शिक्षण पूर्ण करण्याचा पवित्रा घेतला. थोडक्यात शामलने बंड करुन लग्न करणे नाकारले आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.पहिल्या प्रयत्नात तिला पूर्व परीक्षेत यश मिळालं नाही.
मग दुसऱ्यावेळी तिने प्रचंड मेहनत घेतली. पहिल्या वेळी अपयश का आलं याची कारणं शोधून त्यावर तिने काम केलं आणि दुसऱ्याच प्रयत्नात तिने मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. मुलाखतीच्या वेळी संकटाला सामना देखील केला. त्यामुळे नुकतंच यूपीएससीचा निकाल लागला असून वयाच्या २४व्या वर्षी शामल भगत हिने देशात २५८ वा क्रमांक पटकावत आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.