मोलमजुरी करणाऱ्या कामगाराचा पोरगा झाला कलेक्टर…
UPSC IAS Success Story : शाहूपुरी घोरपडे गल्लीत दहा बाय दहाच्या खोलीत संसार थाटलेल्या जमादार यांना फरहान व फरदीन ही दोन मुले. खिळे जुळणीच्या व्यवसायातून आई, पत्नी व दोन मुलांचा सांभाळ केला. त्याच्या वडिलांनी सुरूवातीला खिळे जुळविण्याचे काम केले..तर काही काळाने खाजगी प्रिंटिंग प्रेसमध्ये कामगार होते. पण मुलाला उच्च शिक्षित केले.
फरहानने देखील ठरवले की होणार तर कलेक्टरच… त्यानुसार त्याने तयारी केली. सर्वसामान्य कुटुंबातून आल्याने या पदाचा सर्वसामान्यांना कसा उपयोग होईल हीच त्याने दुरदृष्टी ठेवली आहे. नुकतीच, इरफान अल्लाबक्ष जमादार यांच्या फरहान जमादार याने खडतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन कलेक्टपदाला गवसणी घातली. मुस्लिम समाजातील या मुलाने तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
फरहानने चौथीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या एस्तेर पॅटर्न शाळेत घेतले. पाचवी ते आठवीपर्यंत दादासाहेब मगदूम हायस्कूल व नववी-दहावी सुसंस्कार हायस्कूल, कदमवाडी येथे घेतले. अकरावी आणि बारावी विवेकानंद कॉलेजमधून पूर्ण करून बी.टेक.साठी सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.परिस्थितीची जाणीव असल्याने आजही फरहान सायकलचा वापर करतो. पदवीनंतर स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्यानंतर पहिल्या प्रयत्नात अपयश आले; मात्र खचून न जाता त्याने पुन्हा दोनवेळा परीक्षा दिली. सलग तीनवेळा अपयश आल्याने स्पर्धा परीक्षेचा नाद सोडण्याचा विचार केला;
मात्र आई- वडील आणि मित्रांच्या प्रोत्साहनामुळे त्याने चौथा प्रयत्न केला. या प्रयत्नात मात्र त्याने यशाला गवसणी घातली. एवढेच नाही, तर देशात १९१ वा क्रमांक मिळविला. लेखी परीक्षा पास झाल्यानंतर त्याने वर्षभर दिल्लीमधून अभ्यास केला. या मेहनतीला अखेर यश मिळाले.सायकलवरून सुरू झालेला प्रवास त्याला थेट आयएएस अधिकाऱ्यापर्यंत घेऊन गेला. यूपीएससी परीक्षेत देशात १९१ वी रँक मिळवत पूर्ण झाला.