UPSC IAS Success Story : एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, तसेच काहीसे प्रीतीने केले. तिने आपले आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि प्रचंड मेहनत घेऊन यूपीएससीची परीक्षा दिली. प्रीती बेनीवाल (Priti Beniwal) ही मुळची हरियाणामधल्या दुपेडी गावात लहानाची मोठी झाली आहे. प्रीतीचे शिक्षण तिच्या गावाजवळच्या फाफडाणा गावात एका खाजगी शाळेत झाले होते. तसेच तिने दहावीच्या परीक्षेतदेखील खूप चांगले गुण मिळवले होते.इसराना कॉलेजमधून तिने बी.टेक व एम.टेक या दोन्ही विषयांमध्ये पदवी प्राप्त केली.
प्रीतीने तिचे एम.टेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, वर्ष २०१३ ते २०१६ या काळात बहादूरगडमधील एका ग्रामीण बँकेत लिपिक म्हणूनही काम केले. प्रीतीचे वडील हे पानिपत थर्मल प्लांटमध्ये नोकरी करत असत. तसेच तिची आई बबिता ही जवळच्या अंगणवाडीत काम करत होती. सारे काही व्यवस्थित चालले होते. पण गाझियाबाद रेल्वेस्थानकावर प्रीतीचा मोठा अपघात झाला. कुणालाही काही कळण्याच्या आत प्रीती वेगाने येणाऱ्या रेल्वेसमोर आली आणि ती गाडी तिच्या अंगावरून गेली.
त्यामुळे तिला १४ सर्जरी कराव्या लागल्या होत्या, त्यामुळे जवळपास एक वर्षभर अंथरूणात होती. अपघातानंतर प्रीतीच्या नवऱ्याने तसेच सासरच्या मंडळींनी प्रीतीचा पुन्हा स्वीकार केला नाही, परिणामी तिचा संसार मोडला. समस्यांचा अक्षरशः डोंगर उभा राहिला. आपली परिस्थिती सुधारायची असेल तर काही तरी बनले पाहिजे. हे तिने ठरवले आणि युपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पण, तिचे दोन प्रयत्न असफल ठरले. अखेरीस वर्ष २०२० मध्ये प्रीती परीक्षेत उत्तीर्ण झाली. तसेच तिने ७५४ रँकदेखील पटकावला आणि ती आयएएस अधिकारी झाली.