हिंमत, मेहनत आणि विश्वास असेल तर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड नाही, असे म्हणतात. मग ते आयुष्य असो वा अभ्यास. IAS अधिकारी वरुण बरनवाल यांचीही अशीच कहाणी आहे. ज्या व्यक्तीकडे कधीकाळी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे नव्हते, कुटुंब आर्थिक संकटातून जात होते, तो माणूस एके दिवशी आपल्या मेहनतीच्या जोरावर UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IAS झाले. वरुण बरनवालने 2013 च्या यूपीएससी परीक्षेत 32 वा क्रमांक मिळविला आणि आयएएस अधिकारी बनले. वरुण यांचा IAS होण्याचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
वरुण बरनवाल हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील रहिवाशी आहेत. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वरुण दहावीमध्ये होते तेंव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी पुढं शिकण्याची आशा सोडली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. अशा परिस्थितीत लहानपणापासूनच अभ्यासात टॉपर असलेल्या वरुणने दहावीची परीक्षा दिल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि वडिलांचे सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले.
त्यानंतर काही महिन्यांनी दहावीचा रिझल्ट लागला. त्यामध्ये ते शाळेत पहिले आले. “या निकालानंतर मी पुढं शिकावं अशी घरच्या मंडळींची इच्छा होती. आम्ही सर्व जण काम करु, तू शिक्षण सुरु ठेव,’’ असं आईनं सांगितल्याची आठवण वरुण यांनी सांगितली.
वरुणच्या आयुष्यातील त्यानंतरची दोन वर्ष ही खूप आव्हानात्माक होती. ते सकाळी 6 वाजता उठून शाळेत जात असत. त्यानंतर घराला हातभार लावण्यासाठी दुकानात काम आणि मुलांची ट्यूशन घेणे अशी दोन कामं ते करत होते. “मी चांगला अभ्यास केला तर प्रिन्सिपल माझी फी माफ करतील असं मला वाटत होतं. फी माफ मिळावी म्हणून अधिक जोमानं अभ्यास करण्याचा निश्चय केला. त्यानंतर प्रत्यक्षातही तसेच झाले. मला चांगले मार्क्स मिळाले आणि मी प्रिन्सिपल सरांना फी माफ करण्याची विनंती केली. प्रिन्सिपल सरांनी ती विनंती मान्य केली आणि माझं पुढील शिक्षण झालं,’’ असे वरुण यांनी सांगितले.
मित्रांनी केली मदत
बारावीनंतर वरुण इंजिनीअरिंगची प्रवेश परीक्षा पास झाले. त्यानंतर कॉलेजमधील प्रवेशाच्या वेळी घरातील व्यक्तींसोबतच मित्रांनी आणि त्यांच्या पालकांनी एकत्र येऊन त्यांची फीस भरली. इंजिनीअरिंगला असतानाच त्यांनी UPSC ची तयारी सुरु केली होती.
इंजिनीअरिंग झाल्यानंतर वरुण यांना चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. मात्र त्यांची UPSC ची परीक्षा देण्याची इच्छा होती. ‘त्यावेळी मला भावानं मदत केली’, असं वरुण सांगतात. वरुणच्या कष्टाचं फळ झालं. त्यांचा UPSC च्या परीक्षेत 32 वा क्रमांक आला. भावाने निकाल सांगितल्यानंतर वरुण यांना अश्रू आवरले नाहीत. प्रामाणिक प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर कितीही बिकट परिस्थितीवर मात करुन स्वप्न साकार करता येतं वरुण यांची यशोगाधा याचंच उदाहरण आहे.
वरुणच्या कष्टाचं फळ झालं. त्यांचा UPSC च्या परीक्षेत 32 वा क्रमांक आला. भावाने निकाल सांगितल्यानंतर वरुण यांना अश्रू आवरले नाहीत. प्रामाणिक प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर कितीही बिकट परिस्थितीवर मात करुन स्वप्न साकार करता येतं वरुण यांची यशोगाधा याचंच उदाहरण आहे.