UPSC IPS Success Story राजस्थानमधील सीकर येथील प्रीती चंद्रा या बिकानेरच्या एसपी आहेत. त्या बिकानेरच्या पहिल्या महिला एसपी असून त्याच्या चांगल्या कामामुळे चर्चेत असून त्यांना राजस्थानची ‘लेडी सिंघम’ म्हणूनही ओळखले जाते. आतापर्यंत प्रीतीने मानवी तस्करी आणि देह व्यापारात गुंतलेल्या अनेक टोळ्यांचाही पर्दाफाश केला आहे.त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
१९७९ मध्ये सीकर जिल्ह्यातील कुंदन गावात जन्मलेल्या प्रीती चंद्रा आयपीएस अधिकारी होण्यापूर्वी शाळेत शिक्षिका होत्या. आधी त्यांना पत्रकार व्हायचे होते, पण एम.फिल केल्यानंतर त्यांनी एका शाळेत शिकवायला सुरुवात केली. मात्र, काहीतरी मोठे करण्याचा ध्यास त्यांच्या मनात होता आणि त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. जयपूरमध्ये कोचिंगची सुविधा उपलब्ध नव्हती. तरीही त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. २००८ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत देशात २५५ वा क्रमांक पटकावला.
IPS अधिकारी झाल्यानंतर प्रीती चंद्रा प्रथम राजस्थानमधील अलवर येथे होत्या. बुंदी आणि कोटा एसीबीमध्ये एसपी म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांची करौली येथे एसपी पदावर बदली करण्यात आली आणि सध्या त्या बिकानेरमध्ये एसपी पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय प्रीती चंद्रा यांनी जयपूर मेट्रो कॉर्पोरेशनचे पोलीस उपायुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.
करौलीमध्ये तैनात असताना प्रीती चंद्रा यांनी अनेक गुन्हेगारांना लगाम घातला. एसपी या नात्याने तिने दरोडेखोरांमध्ये इतकी भीती निर्माण केली की त्यांच्यापैकी अनेकांनी आत्मसमर्पण केले. IPS प्रीती चंद्रा आपल्या टीमसोबत दऱ्याखोऱ्यात उतरायची. तिने अनेक अड्ड्यांवर पोहोचून ऑपरेशन केले आणि अनेक अल्पवयीन मुलींना देह व्यापाराच्या नरकातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्या कामाची खूप चर्चा झाली आणि त्यामुळेच त्यांना लेडी सिंघम हे नाव देखील देण्यात आले.