पत्रकार ते आयपीएस वाचा प्रीती चंद्रा यांच्या या जिद्दीचा प्रवास…
UPSC IPS Success Story : कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आपल्यात जिद्द, समर्पण वृत्ती आणि जुळवून घेण्याची क्षमता असेल तर आपण त्या परीक्षेत नक्कीच यश मिळवू शकतो. कारण, विशेषतः स्पर्धा परीक्षेत सर्व पायऱ्या योग्यप्रकारे पार करून मगच यश हातात येते. याच परीक्षा नवी स्वप्ने बघायला देखील प्रेरित करतात. पत्रकार असलेल्या प्रीती चंद्रा आयपीएस कशा झाल्या? वाचा त्यांची ही यशोगाथा…
प्रीती यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि बेताची होती. त्यांची आई अशिक्षित असली तरी त्यांनी मुलीला मात्र शिकवले.त्यांच्या आईने दिलेले प्रोत्साहन हा प्रीती यांच्या शैक्षणिक प्रगतीतला महत्त्वाचा घटक आहे.राजस्थानातल्या सिकरमधल्या कुंदन गावात जन्मलेल्या प्रीती यांनी शालेय शिक्षण सरकारी शाळेतून घेतलं. त्यांनी जयपूरच्या महाराणी कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले.त्यांनी पत्रकारितेत करिअर करायचं सुरुवातीला ठरवले होते. नंतर मात्र त्यांना आयपीएस अधिकारी व्हावंसं वाटायला लागले.
खरंतर, अधिकारी होणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आवश्यक असते. असे असून देखील त्यांनी पत्रकारितेतील करिअर बाजूला सारून स्पर्धा परीक्षेचा विचार केला. जयपूरमध्ये त्यांना कोचिंगची सुविधा उपलब्ध नव्हती. तरीही त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. या संपूर्ण प्रवासात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. तरी देखील त्यांनी चिकाटी सोडली नाही.यात त्यांना अपयश देखील आले पण त्यांनी पुन्हा नव्याने अभ्यासाला सुरुवात केली.
स्वप्नपूर्तीसाठी सगळ्यात मोठी गरज असते, ती निश्चित ध्येयाकडे जिद्दीने वाटचाल करण्याची आणि अडथळ्यांना न घाबरता त्यांना सामोरं जाण्याची. हेच आयपीएस प्रीती चंद्रा यांच्या कहाणीत पाहायला मिळते. अखेर, २००८ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत देशात २५५वा क्रमांक पटकावला आणि त्या आय.पी.एस झाल्या.प्रीती यांचे पती विकास पाठक हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत.