UPSC Success Story : आयुष्यात ध्येय ठरलं असेल आणि ते पूर्ण करण्याची जिद्द असेल तर तुम्हीही काहीही करु शकता. देशातील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी ठरलेल्या सफीन हसन यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
सफीन हसन हा मूळात गुजरातमधील सूरत जिल्ह्याचा कानोदर रहिवासी आहे. त्याची घरची परिस्थिती बेताची होती. पण पालकांनी मुलांना उच्च शिक्षित केले. जेव्हा सफीन हसनला त्याच्या अभ्यासासाठी अधिक पैशांची गरज होती तेव्हा त्याच्या आईने आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्थानिक रेस्टॉरंटमध्ये चपात्या बनवायचे काम केले. तर वडिलांची हिऱ्याची कारखान्यातील नोकरी गेल्यानंतर त्यांनी देखील इलेक्ट्रिशिअनचं काम हाती घेतलं. इतकेच नाहीतर थंडीमध्ये अंडी आणि चहाचा स्टॉलही लावला.
या परिस्थितीची जाणीव ठेवून सफीन यांनी जिद्दीने अभ्यास केला. याची जाणीव तरी कशी झाली? सफीन पाचवीत असताना शाळेची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आले होते. त्यांचा रुबाब पाहून सफीन यांनी शिक्षकांना हे कोण आहेत असं विचारलं होतं. त्यावर शिक्षकांनी त्यांना समजावं म्हणून हे जिल्ह्याचे राजे आहेत असं सांगितलं होतं. पण सफीन यांच्या मनात ती गोष्ट घर करुन राहिली आणि त्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचं ठरवले.
पण हा संपूर्ण प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. गावातील शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला अकरावीमध्ये विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा होता. मात्र गावात सुविधा नव्हती. त्याच्या शिक्षकांनी सफिनच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला. त्यांनी सफिनला अभ्यासाची संधी दिली आणि फीच्या ओझ्यातून मुक्तता केली. पुढे सफीनने एनआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला दिल्लीला जाण्याची आणि नागरी सेवा परीक्षांची तयारी करण्याची इच्छा होती, पण पुन्हा पैशांची अडचण समोर आली.
त्यावेळी त्याच्या गावातीलच एका कुटुंबानं सफीनच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलत त्याला दिल्लीला पाठवले.नोकरी गेली आणि आर्थिक संकट उभं राहिले. यात सफीनचा अपघात झाला तर एकदा तो भयंकर आजारी पडला. पण तरीसुद्धा त्यांनी अभ्यास कमी केला नाही कारण त्यांना पहिल्या १० मध्ये यायचे होते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. २०१७ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी सफिनने ५७० व्या क्रमांकासह पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आणि जामनगरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली होती. सध्या ते अहमदाबादमध्ये कार्यरत आहेत.