UPSC IRS Success Story : घरची आर्थिक परिस्थिती बेताची…शांताप्पा अवघ्या एका वर्षाचे असताना त्यांच्या डोक्यावरील पित्याचं छत्र हरपलं.बेल्लारी जिल्ह्यातील होसा जेनिकेहल गावातून आलेल्या या तरुणाचं बालपण हलाखीत गेलं. वडील गेल्यानंतर त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यानंतर त्यांच्या आईने शांतप्पांचं पालनपोषण करण्यासाठी इतरांच्या शेतात मोलमजुरी केली. या परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी अधिकारी होण्यासाठी तयारी सुरू केली.
पण यात वारंवार अपयश येत राहिले. पोलीस उपनिरीक्षक रूजू असूनही त्यांनी अभ्यास चालू ठेवला. काम आणि अभ्यास समतोल साधत राहिले.शांताप्पा के. उर्फ शांताप्पा जादमानवर हे यूपीएससीत तब्बल सात वेळा अपयशी ठरले. शांताप्पा पदवी परीक्षेत चार विषयांमध्ये नापास झाले होते. असा तरूण पुढे यूपीएससीसारख्या परीक्षेत उत्तीर्ण होईल असं कोणालाच वाटलं नसेल.मात्र आठव्या प्रयत्नात त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.शांताप्पांची शाळा-महाविद्यालयात जेमतेम प्रगती चालू होती. पदवीपूर्व परीक्षेत तर ते नापास झाले. त्यानंतर पुढच्या प्रयत्नात ते ३९ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले.
त्यामुळे, त्याच्या महाविद्यालयातील आणि गावातील मित्रांचं त्याच्याबरोबरचं वागणं बदललं. त्यामुळे त्यांना समजलं की शिक्षणाशिवाय या जगात आपल्याला काहीच किंमत मिळणार नाही. मग त्यांनी अभ्यासावर लक्ष दिलं. वीरशैव महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला.शांताप्पा शाळेत फार हुशार नव्हते. एका बाजूला आई मोलमजुरी करून घराचा आर्थिक गाडा ओढत होती.
आईने काबाडकष्ट करून त्यांना वाढवलं, शिकवलं आणि पोलीस उपनिरीक्षक केलं.सुरुवातीच्या काळात यूपीएससीत अपयश आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या बाजूला पोलीस होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि २०१६ मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक झाले. पोलीस झाल्यानंतरही त्यांनी त्यावर समाधान न मानता यूपीएससीचा अभ्यास चालूच ठेवला. त्यांची वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये बदली होत होती. पोलीस खात्यातही ते त्यांचं काम चोख करत होते आणि यूपीएससीची तयारी करत होते. अखेर सात वेळा अपयशाला सामोरे जाणाऱ्या शांताप्पा यांना यंदा यूपीएससीत यश मिळालं. ते देशात ६४४ व्या क्रमांकाने या परीक्षेत उत्तीर्ण झाले.शांताप्पा बंगळुरू शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील कमांड सेंटरमध्ये तैनात आहेत. आताच्या युपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशानंतर यूपीएससी रँक पाहता त्यांची आयपीएस किंवा आयआरएस अधिकारी म्हणून नेमणूक होऊ शकते.