UPSC Success Story : खरंतर गावाखेड्यात राहून परिस्थितीशी सामना करून यशवंत होणारे विद्यार्थी हे अनेक नव्या गोष्टी करण्यासाठी उमेद देतात. असाच अजिंक्य शिंदे. अजिंक्य याने युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले असून त्याला आता डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसरचं पद मिळणार आहे. तो ऑल इंडिया रँक १०२ सह उत्तीर्ण झाला आहे.
अजिंक्य हा जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील आनंदगाव या छोट्याशा गावचा रहिवासी. त्याची घरची परिस्थिती बेताची… संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहे.शेती हा आई-वडिलांचा पारंपारिक व्यवसाय आहे. तरी देखील अजिंक्य याने उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. अजिंक्य शिंदे याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर त्याने परभणी येथील सारंग विद्यालयात शिक्षण घेतले. इयत्ता आठवी ते बारावीचे शिक्षण त्याने ज्ञान तीर्थ विद्यालयात घेतले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर त्याने विज्ञान शाखेत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्याने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. आता खर्च कसा भागणार? हा प्रश्न डोके वर काढत होता. पण अजिंक्यने पुण्यात जाण्याचे धाडस दाखविले. त्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससीला प्रवेश घेतला.सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात तो एमएससीचे शिक्षण घेतोय.
ज्ञानतीर्थ विद्यालयातील नितीन लोहट शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचं खुळ अजिंक्यच्या डोक्यात घुसले होतेच. त्यामुळे हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालूच होता. त्यात कोविड काळ आला. दरम्यानच्या काळात आलेल्या कोरोनामध्ये मोठे बंधू निळकंठ शिंदे यांचं निधन झालं. त्यामुळे तो प्रचंड खचला.पण यातून मार्ग काढून त्याने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर त्याने अवघ्या दोनच वर्षांमध्ये महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.अजिंक्यने ऑल इंडिया रँक १०२ मिळवून कुटुंबाचा भार सांभाळत अजिंक्यने यूपीएससी परीक्षेचं शिखर सर केलंय. नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अजिंक्य शिंदे महाराष्ट्रातून प्रथम आला.त्याला आता डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसरचं पद मिळणार आहे.