शेतकऱ्याच्या लेकाची यशाची कहाणी; अक्षय वाले झाला वर्ग एक अधिकारी !
UPSC Success Story : जेमतेम दोन एकर शेती….त्यातही हंगामी पिके अशा वातावरणात संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून तरी देखील अक्षयच्या वडिलांना (पोपट वाले) यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते. अशा अडचणीच्या परिस्थिती वर ही त्यांनी मात करून मुलाला शिकविले.
अक्षय वाले हा यावली येथील रहिवासी…त्याचे सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण मोहोळ येथील नागनाथ विद्यालय व नेताजी प्रशालेत झाले. आठवीत असताना त्याने एन एम एम एस परीक्षेत जिल्ह्यात दहावा क्रमांक पटकावला होता. नंतर उच्च शिक्षणासाठी तो पुणे येथे गेला. तेथील शेतकी महाविद्यालयातून बीएससी ऍग्री ही कृषी विभागाची पदवी संपादन केली.
आपली घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला कष्टाची जाणीव होती. त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
त्याच्या वडिलांनी देखील हिमंत न हरता हंगामी शेती पिकवली व शिक्षणाचे महत्त्व जाणून आपल्या मुलाला शिक्षणाचे बाळकडू दिले.पुण्यात राहून अक्षय याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. अभ्यास करून परीक्षा दिली वडिलांची प्रेरणा घेऊन ‘यूपीएससी’ ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नात ‘भारतीय वन सेवा- वर्ग एक’ या विभागात देशात १०० व्या रँक ने उत्तीर्ण झाला. मित्रांनो, आपली परिस्थिती कशीही असली तरी जिद्द मोठी असेल तर परिस्थिती नक्कीच बदलते.