दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर त्याला राज्यसभेतही मंजुरी मिळाली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात केंद्र सरकारनं मंजूर करून घेतलेल्या सुधारीत नागरिकत्व कायद्याला मात्र देशभरातून विरोध होत आहे. देशाच्या अनेक राज्यांत निदर्शनं, मोर्चे आणि आंदोलनं झाली. काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले.
CAA कशाचं सक्षिप्त रूप आहे?
सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा
CAB कशाचं सक्षिप्त रूप आहे?
सिटिझनशिप अमेंडमेंट बिल अर्थात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक
काय आहे नागरिकत्व कायदा
या कायद्यानुसार, हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ईसाई धर्मांचे जे सदस्य ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आले आहेत, आणि ज्यांना त्या देशांमध्ये धार्मिक अन्याय सहन करावा लागला आहे, अशा नागरिकांना बेकायदेशीर प्रवासी मानता येणार नाही. तर, या कायद्यानुसार आता अशा नागरिकांना भारताची नागरिकता देण्यात येणार आहे.
फायदा कोणाला नाही?
श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.
कोणाला लागू नाही?
घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, १८७३ मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना ही दुरुस्ती लागू नाही.
NRC कशाचं सक्षिप्त रूप आहे?
नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स